मुंबई, दि. ४ (पीसीबी) : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजप सोबत एकत्र येत अखेर महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. भाजप -शिंदे गटाने बहुमत चाचणी जिंकताच राज्यात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. आधीच अडचणीत असलेल्या महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ होणार असल्याचे दिसत आहे.
आता या आघाडीतून काँग्रेस पक्ष बाहेर पडणार आहे, अशी माहिती दिल्लीहून येत आहे. काँग्रेस पक्ष आघाडीतून फारकत घेण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार विनय सहस्रबुद्धे म्हणाले, ” शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष ‘सत्ता’ या एकमेव कारणासाठी एकत्र आले होते. आता सत्ता नाहीशी झाली आहे, जे पक्ष एमव्हीएचा भाग होते ते आता दुसऱ्या पर्यायाचा विचार करतील यात काही विशेष नाही.”













































