मसाला पानाचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला बेदम मारहाण

0
157

खेड, दि. ५ (पीसीबी) – मसाला पानाचे पैसे मागितल्याने चौघांनी मिळून टपरी चालवणाऱ्या तरुणाला आणि त्याच्या मामाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) रात्री साडेनऊ वाजता खेड तालुक्यातील निघोजे येथील पंचरत्न पान टपरीवर घडली.

देवेंद्र प्रताप विजय प्रताप सिंग (वय 19, रा. निघोजे, ता. खेड), ब्रिजेश सिंग अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी देवेंद्र यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रणजीत एरकर आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवेंद्र यांचे मामा ब्रिजेश यांची निघोजे गावातील डोंगरवस्ती येथे पंचरत्न हॉटेल समोर पंचरत्न पान टपरी आहे. त्या टपरीवर देवेंद्र आणि त्यांचे मामा शुक्रवारी रात्री काम करत होते. त्यावेळी तिथे आरोपी आले. रणजीत याने देवेंद्र यांच्याकडून दोन मसाला पान घेतले. त्यानंतर माणिकचंद गुटखा मागितला. मात्र आपल्याकडे माणिकचंद गुटखा नसल्याचे सांगत देवेंद्र यांनी रणजीत याच्याकडे मसाला पानाचे पैसे मागितले. त्यावरून रणजीत याने टपरीमध्ये ठेवलेले पितळी भांडे देवेंद्र यांच्या डोक्यात मारून शिवीगाळ केली. मला पैसे मागतो. मला ओळखत नाही का. तुला इथे धंदा करायचा आहे का, अशी रणजीत याने धमकी दिली. त्यानंतर रणजीत आणि त्याच्या तीन साथीदारांनी देवेंद्र यांच्या मामाला देखील मारहाण करून दुखापत केली. आरोपींनी टपरीच्या गल्ल्यातील 2700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि दुचाकीवरून पळून गेले. या भांडणात टपरी मधील साहित्य पडल्याने त्याचे नुकसान झाले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.