मसाप पिंपरी चिंचवड शाखेचा राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

0
394

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने प्रतिभा महाविद्यालय चिंचवड येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वाङ्‍‍मय पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक डॉ. नं. म. जोशी यांना पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते जीवनसाधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, मसाप पुणे चे उपाध्यक्ष राजीव बर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ उपस्थित होते.

कादंबरी, ललित, कथा कविता आणि बालसाहित्य या पाच साहित्य विभागातील पुरस्कारासाठी महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या पुस्तकांमधून परिक्षकांनी दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक विभागातील
“उत्कृष्ट वाङ्‍‍मय पुरस्कार” व “लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कार” मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

कादंबरी विभागात-
पांडुरंग जोशी स्मृती उत्कृष्ट वाङ्‍‍मय पुरस्कार व नाना दामले स्मृती लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कार
डॉ. स्मिता दातार मुंबई यांना ‘फक्त “ती” च्या साठी’ तर शीतल देशमुख डहाके यवतमाळ यांना “व्हेन माय फादर” या कादंबरीला अनुक्रमे उत्कृष्ट व लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ललित विभागात –
रविंद्र पाटील पुरस्कृत ललित वाङ्‍‍मय पुरस्कार
धनश्री लेले ठाणे यांना “अलगद” तर, नंदकुमार मुरडे पुणे यांच्या “दस्तऐवज शब्दांचा” या पुस्तकाला अनुक्रमे उत्कृष्ट व लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कथा विभागात-
अशोक इनामदार स्मृती वाङ्‍‍मय पुरस्कार
दत्तात्रय सैतवडेकर मुंबई यांच्या “ब्रेकींग न्यूज़” ला, तर रमेश पिंजरकर पुणे यांच्या “अरण्य-रुदन” या कथासंग्रहाला अनुक्रमे उत्कृष्ट व लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कविता विभागात-
अपर्णा मोहिले स्मृती वाङ्‍‍मय पुरस्कार
शशिकांत हिंगोणेकर, जळगाव यांच्या “युद्धरत” ला तर विलास गावडे पनवेल यांच्या “देशाचं महानिर्वाण” या काव्यसंग्रहाला अनुक्रमे उत्कृष्ट व लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बालसाहित्य विभागात-
दि. बा. कुलकर्णी स्मृती उत्कृष्ट वाङ्‍‍मय व संभाजी बारणे पुरस्कृत लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कार
विनोद पंचभाई पुणे यांच्या “हे खरे जगज्जेते” चरित्रात्मक पुस्तकाला व मुरहारी कराड लातूर यांच्या “नव्या जगाची मुले” या काव्यसंग्रहाला विभागून, तर रमेश वंसकर गोवा यांच्या “आइस्क्रीमचं तळं” या काव्यसंग्रहाला अनुक्रमे उत्कृष्ट व लक्षवेधी वाङ्‍‍मय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. सुधीर गाडगीळ यांनी डॉ. न. म. जोशी यांच्या साहित्यिक कारकिर्दिवर आधारित त्यांची मुलाखत घेतली. प्रभुणे आणि बर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले, माधुरी मंगरूळकर, जयश्री श्रीखंडे, श्रीकांत जोशी, किशोर पाटील, प्राची कुलकर्णी डॉ. दिलीप गरूड, यांनी संयोजन केले. किरण लाखे, संजय जगताप यांनी सुत्रसंचालन केले. ऐनापुरे यांनी आभार मानले.