मला हालक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदेंच्या इशाऱ्याने खळबळ

0
10

नागपूर, दि २१ ( पीसीबी ) : शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विदर्भ दौऱ्यावर असून नागपूरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते सहभागी होत आहेत. त्याच अनुषंगाने नागपूर दौऱ्यावर आले असता पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. तसेच, विरोधकांवर जोरदार टीकाही केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे, अनेक मंत्रिमंडळ बैठकीला त्यांची अनुपस्थिती दिसून आली होती, तर आपल्या साताऱ्यातील दरेगावातील मुक्कामही वाढला होता. त्यानंतर, आता ते शिवसेना पक्षाच्या मेळाव्यात सक्रिय झाले असून विरोधकांना थेट इशारा देत आहेत. मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा असे म्हणत आहेत. त्यामुळे, एकनाथ शिंदेंचा हा इशारा नेमका कोणासाठी आहे, विरोधकांसाठी की सत्तेतील सहकाऱ्यांसाठी याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आज विदर्भ दौऱ्यावर असून दोन मेळावे आयोजित केले आहेत. निवडणूक प्रचारात मी सांगितले होते की निवडणूक जिंकल्यानंतर मी येईल, त्या अनुषंगाने आजचा दौरा आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.

विधानसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आहे, त्याच अनुषंगाने लोकांचे आभार मानायला मी विदर्भात आलो आहे. मी आधीच बोललो आहे, ज्यांनी मला हलक्यात घेतले मी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. त्याच अनुषंगाने सर्वांनी माझं मूल्यमापन करावे. ज्यांनी मला हलक्यात घेतले, त्यांचा मी 2022 मध्ये टांगा पलटी केला. सरकार बदललं आणि लोकांच्या मनातला डबल इंजिनचा सरकार आणून दिले. विधानसभा निवडणुकीच्या आधी सांगितले होते की, मी आणि देवेंद्र फडणवीस 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणू, यंदाच्या निवडणुकीत 232 जागा आणल्या आहेत. त्यामुळे, लोकांनी मला हलक्यात घेऊ नये, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना व संबंधितांना थेट इशारा दिला आहे.

मला महादजी शिंदे पुरस्कार मिळाला, शरद पवार यांच्याहस्ते हा पुरस्कार दिला गेला. एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी व्यक्तीला पुरस्कार देतो, आणि महादजी शिंदेंसारख्या पराक्रमी महापुरुषाच्या नावाने पुरस्कार दिला जातो, त्यासंदर्भात ही लोकं किती जळले, किती जळणार, एक दिवस जळून खाक होणार अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तसेच, पुरस्कार सोहळ्यातून शरद पवार यांचाही अपमान करण्यात आला, साहित्यिकांना दलाल म्हणून त्यांचा अपमान केला, महादजी शिंदे यांच्या वंशजांचाही अपमान केला. कधी तरी सुधरा, माझ्यावर कितीही आरोप करा, शिव्या द्या, जोवर जनता आमच्यासोबत आहे काहीच होणार नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.