“मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, त्याऐवजी…”, अजित पवारांच्या वक्तव्याने खळबळ

0
223

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत बुधवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी मोठं वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली होती. मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, त्याऐवजी मला पक्ष संघटनेत हवी ती जबाबदारी द्या असं अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासह पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांसमोर व्यक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीत काही दिवसांपूर्वी पक्ष संघटनेत नव्या जबाबदाऱ्या दिल्याच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अजित पवार यांनी केल्यानं आता पुढे काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांच्यासह नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सकाळी पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या दादाची सर्व इच्छा पूर्ण व्हावी हीच माझीही इच्छा आहे. दादांना संघटनेत पदावर संधी द्यायची की नाही हा संघटनात्मक निर्णय आहे. मला मनापासून आनंद हे की दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्ता केडरमधे उत्साह संचारलाय, दादांना प्रदेशाध्यक्षपद द्यायचं की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे. माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच बहीण म्हणून इच्छा आहे” अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.