मला भाजपने फक्त गाजर दाखवलं, शरद पवारांनी विश्वास दाखवला

0
314

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : सध्या राज्यभर विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभा निवडणुका उद्या होणार आहेत तर २० जूनला विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. दरम्यान यासाठी सर्व पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची घोषणा केली जात आहे. राष्ट्रवादीने विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर आज अर्ज दाखल करणार आहेत.

राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे एकनाथ खडसे यांनी आभार मानले आहे. यासंदर्भात ते माध्यमांना बोलत होते. “विधानसभेच्या कालखंडात ज्या घटना घडल्या त्यामुळे मला भाजपातून राष्ट्रवादीमध्ये यावं लागलं असं ते बोलताना म्हणाले. मला भाजपने फक्त गाजर दाखवलं. सत्ता माझ्या दृष्टीकोनातून मोठी नाही. पण ज्या प्रकारे मला आधार राष्ट्रवादीने दिला तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्या पडत्या काळात माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्यांवर प्रामाणिक राहणं माझं कर्तव्य आहे.” असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

“शरद पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. पण आज महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंचं योगदान मोठं आहे. मुंडे-महाजन-खडसे यांनी भाजप महाराष्ट्रात मोठी केली, पण भाजपने पंकजा मुंडे यांना तिकीट न देणं ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे, खेदजनक आहे, हे पंकजासाठी अन्याय आहे. ज्यांचं पक्षासाठी योगदान नाही ते पदावर बसतात हे खूप दुर्दैवी आहे. भाजपने पंकजा यांचा विचार करायला पाहिजे होता.” असं मत खडसे यांनी व्यक्त केलं आहे.