मला अमित शहा यांनी आधीच सांगितले होते… अजित पवार यांचा गौप्यस्फोट

0
254

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : देशातील तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. भाजपने यामधील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसने मोठं यश मिळवलं असून बीआरएसला धक्का बसला आहे. या निकालावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले अजित पवार?
मी मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलो होतो, त्यावेळीच त्यांनी निकाल चांगला लागेल असं सांगितलं होतं. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडही येईल. माझं स्पष्ट मत आहे की, काहींनी नको तेवढा आत्मविश्वास दाखवला. मोदींच्या नेतृत्त्वात देशाची प्रतिमा उंचावली. मोदींच्या नेतृत्त्वात देशाचा विकास होत आहे. जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक वाढला आहे. युक्रेनममध्ये युद्धा थांबवून आपल्या लोकांना आणलं होतं. त्यांनी आपले कॉन्टॅक्ट वाढवले असून मोदींनी हायवे, रेल्वेचं जाळ, विमानतळ आणि गुंतवणक वाढवण्यासाठीच्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं अजित पवार म्हणाले.

निकाल लागण्याआधी एक्झिट पोलमध्ये फक्त राजस्थानमध्येच भाजपला यश मिळणार तर काँग्रेसला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता राखण्यात यश मिळणार असल्याचा अंदाज होता. मात्र आता निकाल लागल्यावर तेलंगणा सोडलं तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थामध्ये भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी 24 तासांमधील 15ते 16 तास काम करतात. आपल्या घरी त्यांनी कधी दिवाळी साजरी केली नाही. सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात, परदेश दौरा करून आल्यावरही ते कधी आराम न करता पूढच्या कामाला लागतात. भाजपचा मोदी हा एकमेव चेहरा असून प्रत्येकाने जो निकाल आहे तो मान्य केला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.