दि. ५ (पीसीबी) – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा आरक्षण आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी समाज नाराज झाला असून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. तर, दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले असून त्यांनी थेट बारामतीमध्ये ओबीसी आंदोलन मोर्चा काढायचे ठरवले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनास बारामतीमधूनच रसद पुरविण्यात आल्याचा आरोप करत हाकेंनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवला आहे. मात्र, पोलिसांनी हाकेंच्या मोर्चाला परवानगी नाकारली असून मला अटक करा, तुरुंगात टाका, असे म्हणत हाकेंनी बारामतीत जाणारच असल्याचे म्हटले.
आम्ही कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, अलीकडच्या काळात लोकं हक्कावर बोलायला तयार नाहीत. आपण कारखानदार यांच्या विरोधात बोलतोय, बेकायदा मागणीच्या विरोधात बोलत आहोत. खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार आम्ही तुम्हाला मत दिले नाही का? सरकारने आताचा जो जीआर काढला आहे, त्याने फक्त ओबीसी नाहीतर एसी आणि एसटी यांचेदेखील आरक्षण संपत आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे तत्त्व यांनी जपले आहे. घराणेशाही संविधानाला अपेक्षित आहे, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे. चव्हाण साहेब तुम्ही आज माझा सत्कार केला, तुम्ही दाखवून दिलेला आहे की महाराष्ट्र एक आहे.
आरक्षण गेलं तर गाव गाड्यातील बलुतेदार काय करेल, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र 18 पगड जातीचा आहे. बारामतीला जायचं आहे, रॅलीने जायचंय, उशीर झालाय, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी बारामतीकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र, बारामतीतील नियोजित ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर, अटक झाली तरी आम्ही बारामतीत जाणार, पोलीस असे का वागत आहेत? मुंबईपेक्षा बारामतीतला गणपती मोठा नाही, असे म्हणत लक्ष्मण हाके बारामतीमधील ओबीसी मार्चावर ठाम आहेत. आम्ही आमच्या न्याय हक्काची लढाई लढतो आहोत, ज्यांनी जरांगे यांना रसद पुरवली त्या बारामतीत आम्ही मोर्चा काढत आहोत, असेही हाकेंनी म्हटले.
पोलिसांनी परवानगी नाकारली
बारामतीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार आहे. थोड्याच वेळात या मोर्चाला लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे. मात्र, या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला पुढील तारीख घ्या, अशी आंदोलकांना पोलिसांनी विनंती केली होती. मात्र, आंदोलकांनी आजच मोर्चा काढण्याचे ठरवल्याने या मोर्चाला परवानगी नाकारल्याचे पोलिसांच म्हणणे आहे.