मरुत्सु – पीसीसीओई यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार विद्यार्थी-प्राध्यापकांना जपानमध्ये संशोधनाची संधी

0
248

पिंपरी पुणे (दि. २७ मार्च २०२३) – जपानमधील प्रसिद्ध मरुत्सु उद्योग समूह आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत भारत-जपान मधील विद्यार्थी, प्राध्यापकांना अभ्यास, संशोधनाची संधी मिळणार आहे.

मरुत्सुचे कार्यकारी अधिकारी त्स्युचिया, इनप्रो जपानचे कार्यकारी अधिकारी त्स्युचिडा, फीडेल सॉफ्टटेकचे चेअरमन सुनील कुलकर्णी, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, सहाय्यक संचालक डॉ. निळकंठ चोपडे, आंतरराष्ट्रीय संवाद विभागाचे अधिष्ठाता, सहाय्यक अधिष्ठाता, विविध विद्या शाखांचे विभाग प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

मरुत्सु उद्योग समूह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट क्षेत्रात कार्यरत असून टेक्सास इन्स्ट्रुमेंट कंपनी सह व्यवसाय करीत आहे. कंपनी सेमीकंडक्टर क्षेत्रात ही विस्तार करत असून या बाबतीत भारतीय शैक्षणिक संस्था आणि कंपन्या बरोबर सहकार्य करून व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्नशील आहे.

यावेळी जपानच्या शिष्टमंडळाने इलेक्ट्रॉनिक्स विभागास भेट देऊन प्रयोग शाळेची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प पाहून त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण प्रकल्प तयार केले असून पीसीसीओई उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याबद्दल शिष्टमंडळाने कौतुक व समाधान व्यक्त केले.

पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.