मराठ्यांच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही…

0
3

दि. २९ (पीसीबी) : ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत दाखल होत त्यांनी आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी आंदोलकांशी संवाद साधताना जरांगे पाटलांनी मराठ्यांच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही…असा निश्चयच केला. त्यामुळे सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे यांनी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना शांततेचं आवाहन केले आहे तसेच काही सूचनादेखील दिल्या आहेत. यासोबतच, आरक्षणाबाबत ठाम भूमिका घेत सोबत आलेल्या आंदोलकांना मोठा विश्वास दिला आहे.

सर्व मराठा आंदोलकांना शांत राहण्याचं आणि शिस्त पाळण्याचं आवाहन केलं. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कुणी हलायचं नाही, असे जरांगेंनी सांगितले आहे. मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कुणी हलायचं नाही.
सरकारनं आपल्याला सहकार्य केलंय, आता आपणही सरकारला सहकार्य कराव. समाजाचं नाव खाली जाईल, असं कुणी वागू नका. दारु पिऊन धिंगाणा घालू नका, माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल, असं वागू नका. अशा सूचना त्यांनी यावेळी आंदोलकांना दिल्या.

मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही. मी समाजासाठी मैदानात आलोय,तुमची जबाबदारी पार पाडायची आहे, आपल्याला आपल्या लेकरा बाळांना मोठं करायचे आहे. माझा शब्द खाली पडू देऊ नका, मी तुमचा शब्द खाली पडू देणार नाही.मनोज जरांगे हटणार नाही, ह्याच ठिकाणी उपोषण करून मेलो तरीही, मराठ्यांच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही.अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.