मराठे तुमचा खेळ खल्लास करतील; मनोज जरांगेचे भाजपावर टीकास्त्र

0
86

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केले आहे. मनोज जरांगे यांचे लक्ष आता भाजप नेते प्रसाद लाड ठरले आहे. थोड्या दिवसात ते बी येडं होतं की काय?, ते भी बधिर होतं काय? अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. माझं एकच म्हणणं आहे तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या मराठे डोक्यावर घेऊन नाचतील, तुम्ही नाही दिलं की खेळ खल्लास करतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

तुम्हाला जर राज्यातील 50 ते 55% मराठा विरोधात जाऊ द्यायचा नसेल तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. मराठे दादागिरीला मोजत नाहीत, सगळ्यांची दादागिरी मोडीत काढणार आहे. महाविकास आघाडी सत्तेत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कुठून आरक्षण मागाणार? त्यांना काय प्रश्न विचारणार? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. लोकांची आशा तुमच्याकडून आहे. तुम्ही आरक्षण द्या, मग तुम्हाला फायदा होईल. लोकसभा निवडणुकीत त्यांना फायदा झाला कारण तुम्ही आरक्षण दिले नाही, असे मनोज जरांगे यांनी महायुतीला सुनावले.

संगे सोयऱ्याची आधी सूचना काढली अंमलबजावणी का केली नाही ? सरसकट राज्यातील गुन्हे मागे घेऊ म्हटले होते का घेतले नाही? मराठा आणि कुणबी एकच आहेत आपण का देत नाहीत.? ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्या का थांबून ठेवल्यात हे विचार? एसआयटी का नेमली? बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना नोकऱ्या का दिला नाहीत? शिंदे समितीला मुदतवाढ दिली परंतु शिंदे समिती का काम करत नाही? ईडब्लूएस मराठ्याचे का रद्द केले? अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का झाला नाही ? कोपर्डी घटनेच्या आरोपीला अजून फाशी का नाही? या प्रश्नांची उत्तरे महायुतीने द्यावी, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मराठा नेते राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनावर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, चोरांच्या उलट्या बोंबा असा प्रकार राजेंद्र राऊत यांचा झाला आहे. राजेंद्र राऊत यांचे वक्तव्य म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. लोक म्हणतात, फडणवीस लय हुशार आहेत, ते फोडा त्याला फोडा, असे काम करा. तुम्ही उद्या निवडणुका घेतल्या तरी फसला, चार महिन्यांनी निवडणुका घेतल्या तरी फसलात, फडणवीस साहेब तुम्हाला तोडगाच काढावा लागणार आहे.