मराठी माणसाचा अपमान सहन करणार नाही – अजित गव्हाणे

0
349

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – राज्यपाल या घटनादत्त पदावरील व्यक्तीने आपल्या अकलेची दिवाळखोरी वारंवार दाखवून दिली आहे. देशातील अत्यंत पुढारलेले राज्य असलेल्या, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या आपल्या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी राज्यपाल सोडत नाहीत. राज्यपालांच्या आडून भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचा अवमान सुरू आहे. या राज्यातील जनता हे कदापी सहन करणार नसून यापुढे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अवमान केल्यास राष्ट्रवादीच्या माध्यमातून राज्याची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकविला जाईल, असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या महाराष्ट्राबाबत आणि मराठी माणसाबाबत केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. कॉटन किंग चौक, चिखली-आकुर्डी रोड, स्पाईन रस्ता येथे आयोजित या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे बोलत होते. यावेळी झालेल्या आंदोलनास महिला अध्यक्ष कविता आल्हाट, प्रवक्ते विनायक रणसुभे, नारायण बहिरवाडे, सतिश दरेकर, राजेंद्र साळुखे, हरिभाऊ तिकोणे, काशिनाथ जगताप, विजय लोखंडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, वर्षाताई जगताप, संगीता नानी ताम्हाणे, शमीम पठाण, यश साने, दत्तात्रय जगताप, सचिन औटे, मनीषा गटकळ, अकबर मुल्ला, माधव पाटील, भूपेंद्र ताम्हचिकर, राजू खंडागळे, दिलीप शिंगोटे, ज्योती गोफणे, अशोक मगर, युवराज पवार, अनिल भोसले, संदीप चव्हाण, सागर भुजबळ, नितीन बुधागे, किरण नवले, कविता खराडे, ज्योती तापकीर, संगीता कोकणे, पुनम वाघ, ज्योति गोफने, समीता गोरे, ज्योती निंबाळकर इत्यादी मान्यवरांचा सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना शहराध्यक्ष गव्हाणे पुढे म्हणाले की, यापुढे महाराष्ट्राचा, इथल्या मातीचा इथल्या माणसांबद्दल बोलताना राज्यपालांनी पूर्ण अभ्यास करूनच आपले तोंड उघडावे. आपल्या बोलवित्या धन्याचे ऐकण्याऐवजी महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यावा आणि मगच बोलावे. महाराष्ट्रात फूट पाडण्याचे आणि राज्याचा अवमान करणाचे षडयंत्र राज्यपालांच्या आडून भाजपाने जे सुरू केले आहे त्या भाजपलाही येथील जनता धूळ चारल्याशिवाय गप्प बसणार नाही.”

राष्ट्रवादीच्या शहर महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असल्याचे राज्यपाल विसरले असावेत. त्यांनी केलेल्या अपमानाचा मराठी माणूस बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. येत्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्राला कमी लेखणाऱ्या भाजपाला पिंपरी-चिंचवडची जनता नक्कीच जागा दाखवून देईल, असेही आल्हाट म्हणाल्या.

आपल्या भाषणात बोलताना प्रवक्ते विनायक रणसुभे म्हणाले की, इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती भारतीय जनता पक्षाकडून सध्या राबविली जात आहे. त्यामुळेच राज्यपालासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीचाही महाराष्ट्राच्या व मराठी माणसांच्या एकीला सुरुंग लावण्यासाठी सातत्याने वापर केला जात आहे. मात्र महाराष्ट्र राज्य निर्माण होताना ज्या मराठी बांधवांचे रक्त सांडले त्या बांधवांचे हौतात्म्य आम्ही वाया जाऊ देणार नाही.