मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार; केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांचे आश्वासन

0
326

खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

पिंपरी, 28 मार्च – महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला तात्काळ अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्याकडे केली. त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सांस्कृतिक विभाग सकारात्मक आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री मेघवाल यांनी दिले. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे संसदीय नेते गजानन कीर्तीकर, लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार कृपाल तुमाणे यांनी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन रामपाल मेघवाल यांची मंगळवारी भेट घेतली. यासंदर्भात खासदार बारणे यांनी लोकसभेत दोनवेळा प्रश्न उपस्थित केला होता.

याबाबतची माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, मराठी भाषा ही राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा, सर्वसामान्य माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असल्याने मराठी भाषेला लवकरात-लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली. मराठी भाषेस गौरवशाली व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. अनेक वर्षांपासूनचे मराठी भाषांचे शिलालेख, कोनशिला, ताम्रलेख, पुरातन साहित्य, वस्तू देखील भारतीय पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील मुख्य भाषा मराठी आहे. भारतातील भाषांपैकी मराठी भाषा एक प्रमुख भाषा आहे. महाराष्ट्र, गोव्याची अधिकृत भाषा मराठी आहे. मातृभाषेच्या संख्येच्या बाबतीत मराठी जगात पंधराव्या तर भारतात चौथ्या क्रमांकावर आहे. मराठी भाषा बोलणा-यांची लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे. इ.स.वी सन 900 पासून ही भाषा प्रचलित आहे. हिंदीच्या समान संस्कृतवर आधारित मराठी भाषा आहे. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते. याशिवाय गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्ये मराठी भाषा बोलली जाते. केंद्रशासित प्रदेशांमध्ये दमन-दीव, दादरा आणि नगर हवेलीमध्येही मराठी भाषा बोलली जाते.

भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी मराठी एक भाषा आहे. मराठी भाषा देवनागिरी लिपीत लिहिलेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे 2013 पासून पत्रव्यवहार केला जात आहे. याबाबतचा प्रस्तावही राज्य सरकारने 8 डिसेंबर 2016 रोजी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्याबाबतची फाईल मंत्रालयात तयार आहे.

त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती केली. त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सांस्कृतिक विभाग सकारात्मक आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री मेघवाल यांनी दिले.