पिंपरी, दि. २५ – मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच मराठी संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गुरूवार २७ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
मोरवाडी, पिंपरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता संपन्न होईल.
या कार्यक्रमास सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर मांडेकर, शंकर जगताप आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे यांची सन्माननीय उपस्थिती यावेळी असणार आहे. या मान्यवरांसह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
गुरूवारी सकाळी सव्वा दहा वाजता महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरुवात होईल. यामध्ये महाराष्ट्रातील बोली भाषांमधील गीते सादर केली जाणार आहेत. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता ‘सुलेखन’ या मराठी भाषेतील अक्षरांना स्वभाव देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध सुलेखनकार शरद कुंजीर हे उपस्थितांना याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. शिवचरित्र किर्तनकार ज्ञानेश्वरी ढगे यांचे सुश्राव्य किर्तन या कार्यक्रमात पार पडणार आहे. दुपारी १२ वाजता व्याख्याते डॉ. शिवप्रसाद महाले यांचे ‘युवा शक्तीची स्वर्णिम भारताकडे वाटचाल’ या विषयावर युवांना प्रेरणादायी ठरणारे व्याख्यान होणार आहे. दुपारी १ वाजता राष्ट्रीय भारूडकार हमीद अमीन सय्यद यांच्या पारंपरिक लोककलेचा अविष्कार असलेल्या भारुडाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी यांनी आवाहन केले आहे.