मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजनज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांचा केला जाणार नागरी सन्मान

0
2

पिंपरी, दि. २४ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २५ फेब्रुवारी व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २५ फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृह येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांच्या नागरी सन्मानासह मराठी भाषेचा जागर करणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिच्या वापराची व्याप्ती वाढविणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये प्रसार माध्यम प्रतिनिधी, साहित्यिक, लोककलावंत, कवी सहभागी होणार आहेत, अशी माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमूख उपस्थिती तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे, महापालिकेचे उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त श्रावण हर्डीकर, शहरातील नगरसदस्य, नगरसदस्या तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी प्राचार्य शशिकांत पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.

प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन
बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑटो क्लस्टर सभागृह येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत सकाळी ११ वाजता “पत्रकारिता क्षेत्रात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग” या विषयावर सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व जनसंज्ञापन विभागाचे उपसंचालक प्रा. सुशोभन पाटणकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या विविध व्याख्यान, परिसंवाद, सांस्कृतिक तसेच लोककलाविष्कारांच्या माध्यमातून मराठी भाषेचे समृद्ध सांस्कृतिक वैभव अधोरेखित करण्याबरोबरच पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती देण्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. तरी प्रसार माध्यम प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केले आहे.

२७ फेब्रुवारीला मराठी भाषेचा जागर
शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभादरम्यान महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांचा यावेळी नागरी सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता ते “तमाशा – मराठी भाषा संवर्धन करणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकचळवळ” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १२ वाजता लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर, मुंबई प्रस्तुत “माय मराठीची गौरवगाथा” हा महाराष्ट्राची मराठी भाषा आणि परंपरा विशद करणारा सांस्कृतिक महाकलाविष्कार सादर करण्यात येणार असून यात गायक संदेश विठ्ठल उमप, शाहीर पृथ्वीराज माळी व त्यांचे सहकारी सहभागी होणार आहेत.

दुपारी ३ वाजता स्थानिक निमंत्रित कवींच्या सहभागातून आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी राज अहेरराव असतील. दुपारी ४ वाजता “अभिजात मराठी भाषेचे वैभव” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून त्यात इंद्रायणी साहित्य परिषदेचे अरूण बोऱ्हाडे, पिंपरी चिंचवड शहर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश निर्मल आणि मराठी साहित्याचे अभ्यासक डॉ. धनंजय भिसे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता “आवाज लोकगीतांचा… गंध मराठी मातीचा…” या मराठी लोकगीतांच्या बहारदार कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे, जगदीश गोरसे, विशाल ओव्हाळ, राणी म्हस्के आणि धीरज वानखेडे हे लोकगीत गायक आपली कला सादर करणार आहेत, अशी माहिती विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली आहे. तसेच या कार्यक्रमांना नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.