मुंबई, दि. ४ (पीसीबी) – मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दोन वेळा उपोषण केलं आहे. पण, सरकारनं दिलेल्या आश्वासानंतर जरांगे-पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. तर, या वक्तव्यानंतर जरांगे-पाटील यांनी महाजनांना सूचक इशारा दिला आहे. दरम्यान, चार राज्यांच्या निवडणुकित भाजपला घवघवीत यश मिळाले आणि त्यानंतरच भाजपची भाषा बदलल्याने मराठा आंदोलक संतापले आहेत.
“सरसकट मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. मी जरांगे-पाटील यांची चारवेळा भेट घेतली, तेव्हाही सांगितलंय की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं शक्य नाही. कुणबी दाखले सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. पण, मराठा समाजाला सरसकट आरक्षण कुठल्या कायद्याखाली देणार? हा प्रश्न आहे. न्यायमूर्ती शिंदे आणि न्यायमूर्ती गायकवाड यांनीही मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका मांडली आहे,” असं गिरीश महाजनांनी म्हटलं आहे.
“महाजनांनी मराठा समाजाला नडू नये”
यावर जरांगे-पाटलांनी म्हटलं, “गिरीश महाजन यांनी विचार करावा. कारण, मराठा आरक्षणाचा कायदा तयार करण्यासाठी आम्ही गिरीश महाजनांना ४ दिवसांचा वेळ दिला होता. पण, ‘हा वेळ पुरेसा नसून १ महिन्यांची मुदत द्या, नोदींचा अहवाल करून कायदा तयार करतो,’ असं महाजनांनी सांगितलं. आता महाजनांनी वेगळी विधाने करून मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये.”
“महाजनांनी फडणवीसांचं नाव खराब करू नये”
“गिरीश महाजनांच्या सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. माध्यमांचे व्हिडीओही आहेत. पूर्ण राज्यात ते व्हायरल करू. ‘संकटमोचक’ गिरीश महाजनांनी भरकटल्यासारखी वक्तव्ये करू नये. आमचा महाजनांवर विश्वास असल्यानं तीनवेळा व्यासपीठावर मानसन्मान दिला आहे. आता, महाजनांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब करू नये,” असेही जरांगे-पाटलांनी खडसावलं.