मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने वृद्धाची नदीत उडी…!

0
359

आळंदी, दि. २८ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण व मुलाला अनुकंपावर नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून व्यंकट ढोपरे यांनी वृद्धापकाळात टोकाचे पाऊल उचलले आहे. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदीत त्यांचा आज मृतदेह आढळला. नऱ्हे आंबेगाव येथून काल ते दर्शनासाठी आळंदीत आले होते. सकाळी अकराच्या सुमारास ते तिथून निघाले अन कुटुंबियांना घरातच एक चिठ्ठी सापडली.

त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतो, तरी सरकार याला गांभीर्याने घेत नाही. तसेच २०१२ पासून माझ्या मुलाला अनुकंपावर नोकरी दिली जात नाही. मुलाच्या आईच्या वडिलांच्या जागी त्याला नोकरी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन आम्हाला न्याय देत नाहीत. याच नैराश्यातून मी आत्महत्या करीत आहे, असा आशय त्या चिठ्ठीत होता. त्यामुळे भोसरीत राहणाऱ्या जावयास याबाबत कळवण्यात आले.

तेव्हा आळंदीत त्यांचा शोध घेताना बंधाऱ्यालगत त्यांची पिशवी, मोबाईल, गळ्यातील माळ, चप्पल अन ज्ञानेश्वरीमधील काही कागदं आढळली. त्याच बंधाऱ्यात पोलीस आणि एनडीआरएफकडून शोध सुरू झाला. आज दुपारी तिथेच त्यांचा मृतदेह आढळला. त्यांना पोहता येत असल्याने त्यांनी स्वतःच स्वतःचे हात बांधून इंद्रायणी नदीत उडी घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालात यात आणखी स्पष्टता येईल.