मराठा समाजाच्या लेकरांचे विनाकारण मुडदे पडत आहेत, तरी लक्ष देत नाहीत….

0
272

जालना, दि. १ (पीसीबी) – मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ३२ जण उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे या मुद्द्यावर सर्वांचे एकमत झाले. तसेच मराठा आरक्षणासाठी आणखी वेळ द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वपक्षीय बैठकीनंतर, इतर समाजावर अन्याय न होता मराठ्यांना आरक्षण मिळावं असं आमचं याबाबत सर्वांचं एकमत झालं असून मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग युध्द पातळीवर काम करत आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, मराठा समाजाने संयम राखावा, मनोज जरांगे यांनी सरकारला सहकार्य करावे ही सर्वपक्षीय नेत्यांची भावना असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीनंतर बोलताना म्हणाले.

याबद्दल विचारले असता मनोज जरांगे यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. जरांगे म्हणाले की, सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा आहे? तसेच सरसकट महाराष्ट्राला आरक्ष लगेच देणार का? समाजाला विचारून बघू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.

बैठकीत काय झालं याचा तपशील मिळाला नाही, गोरगरिबांच्या लेकरांकडे लक्ष न देता सरकार नुसत्या बैठका घेत आहे. मराठा समाजाच्या लेकरांचे विनाकारण मुडदे पडत आहेत, तरी लक्ष देत नाहीत. हसण्यावारी नेत आहेत. हे जनता सांभाळणारं सरकार म्हणायचं काय. गोरगरिबांच्या लेकरावर गुन्हे दाखल केले जात आहेत, असेही मनोज जरांगे म्हणाले.