दि.८(पीसीबी) – मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्ता संगीता वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या महिलांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
संगीता वानखेडे असे गुन्हा दाखल केलेल्या महिला कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी संभाजी ब्रिगेड संघटनेचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी फिर्याद दिली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागील आठवड्यात मुंबई येथे आंदोलन केले होते.
या आंदोलनासंदर्भात हिंदुत्ववादी कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांनी मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द काढले होते. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर नुकतीच व्हायरल झाली. त्यामुळे मराठा समाजाच्या महिला भगिनींमध्ये संतापाची लाट उसळली. संगीता वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी चिखली येथील महिलांनी रविवारी दुपारी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजीने पोलीस ठाण्याचा परिसर दुमदुमून गेला. संगीता वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून आणणार नाही, असा पवित्र आंदोलन कर्त्या महिलांनी घेतला. अखेर एमआयडीसी पोलिसांनी संगीता वानखेडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.