मराठा समाजाचे भगवे वादळ पुण्यात धडकले, जोरदार स्वागत

0
215

पुणे, दि. २४ (पीसीबी) : मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. पुण्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या यात्रेत अभूतपूर्व गर्दी झाली आहे. पुण्यामध्ये सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. इतकेच नव्हे तर, पुण्यात आज पहाटे पाच वाजता महाराज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. यावेळी आबालवृद्धांनी केलेली गर्दी ही लक्षणीय होती. यानंतर आता मुंबईच्या दिशेने पदयात्रेचा प्रवास सुरू झाला आहे. पुण्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला न भूतो न भविष्यती असाच पाठिंबा मिळाला.

हाडं गारठवणाऱ्या थंडीतही मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे पुण्यामध्ये अत्यंत दिमाखात स्वागत करण्यात आले. कडाक्याची थंडी असताना सुद्धा त्याची ताम न बाळगता अवघा मराठा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी पुण्यातील रस्त्यांकडे डोळे लावून उभा होता. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पहाटेला झालेली भव्य सभा भव्यदिव्य ठरली. मनोज जरांगे पाटील यांनी आज मध्यरात्री दीडच्या सुमारास वडूज येथे आगमन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. भीमा कोरेगाव परिसरामध्ये विजयस्तंभ परिसरात जरांगे पाटलांच्या स्वागताला रस्त्याच्या दुतर्फा लोक होते.

मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी हजारो मराठा स्वयंसेवक मदत करत आहेत. वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ दिला जाणार नाही, याची सुक्ष्म काळजी प्रत्येक स्वयंसेवकाकडून घेतली जात आहे. आंदोलकांना जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्याविषयी आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य मदत केंद्रे उभारली जाणार आहेत. पुण्यातील पदयात्रा मार्गावर मदत केंद्रे उभारून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे.

आजच्या यात्रेचा मार्ग कसा असणार?
मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा आज सांगवी फाटा येथे दाखल होईल. तेथून रक्षक चौक,जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, पदमजी पेपर मिलमार्गे चापेकर चौक चिंचवडगाव असा मार्ग असणार आहे. पुढे चिंचवड स्टेशन- खंडोबा मंदिर, आकुर्डीमार्गे निगडी, भक्ती-शक्ती समूह शिल्पावरून तळेगावमार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी असतील.