मराठा समाजाचा अंत पाहू नका – उदयनराजे

0
258

अंबड, दि. २ (पीसीबी) : आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. काल (शुक्रवार) मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसाचार झाला. यामधे पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले. दरम्यान आज खासदार उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

स्वत:च्या भाषणानंतर शरद पवार यांनी उदयनराजे यांना माईक दिला. उदयनराजे म्हणाले, मराठा समाजाची सहनशीलता पाहू नका. सर्व समाजातील लोकांना न्याय मिळत असेल तर मराठा समाजाला न्याय का मिळत नाही. हा न्याय फार वर्षापूर्वी मिळायला हवा होता. पण तो का मिळाला नाही हे मला माहित नाही.

अन्याय झाला तर उद्रेक होणे स्वभाविक आहे. शांततेत आंदोलन सुरु ठेवावे. मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली. त्यामुळे चर्चा करुन मागण्या सोडवण्यात येतील. ज्यांनी लाठीचार्ज केला त्या पोलिसांना निलंबित करण्यात यावे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.
उदयनराजे भोसले म्हणाले, ५७ ते ५८ मोर्चे शांततेत काढले पण याचा अर्थ असा नाही की मराठा समाज सहन करतो तर तुम्ही त्यांची परिक्षा बघावी. सर्वात मोठा समाज मराठा समाज आहे, यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. गायकवाड कमिशनचा अहवाल सुप्रीम कोर्टात टिकला नाही. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करावे.