पुणे, दि. २३ (पीसीबी) : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चात मोठ्या संख्येने मराठा बांधव वाहनांसह सहभागी होणार आहेत. त्यामुळे २४ जानेवारी रोजी पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील मोर्चा मार्गावर आणि परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
या परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चा मंगळवारी, २३ जानेवारी रोजी रांजणगांव येथून कोरेगाव भीमामार्गे चोखीदाणी, खराडी येथे मुक्कामी थांबणार आहे. २४ जानेवारी रोजी चोखीदाणी, खराडी येथून पिंपरी चिंचवड परिसरातून लोणावळा येथे मुक्कामी थांबणार आहे.
२४ जानेवारी रोजी वाहतुकीत बदल
बुधवारी, २४ जानेवारी रोजी मराठा आरक्षण मोर्चा पुणे शहरातून पिंपरी चिंचवडच्या दिशेने जाणार आहे. त्याअनुषंगाने वाहतुकीत आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येतील. अहमदनगरहून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथून केसनंद थेऊरमार्गे सोलापूर रस्ता अशी वळविण्यात येतील. वाघोली परिसरामधील वाहने वाघोली आव्हाळवाडी मांजरी खुर्द- मांजरी बुद्रुक – केशवनगर – मुंढवा चौक अशी वळविण्यात येतील.
पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रस्ता जंक्शन, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगांव, वाघोलीमार्गे अहमदनगरकडे अशी वळविण्यात येईल. मराठा आरक्षण मोर्चा जसजसा पुढे मार्गस्थ होईल, त्याप्रमाणे मोर्चाच्या मागील वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या वाहतूक बदलांचा अवलंब करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.