दि. ३ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबईत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने अखेर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचा जीआर काल जारी करण्यात आला. हा जीआर मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. हैद्राबाद गॅझेटच्या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाज ओबीसीत जाणार आहेत. सरकारने काढलेल्या जीआर मुळे सर्व मराठे ओबीसीत जाणार म्हणजे जाणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही लोकांचे ऐकून गैरसमज करुन घेऊ नका असं सांगत त्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.
जरांगे बोलताना म्हणाले, मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली. खूप प्रतीक्षा पाहिली पण ही लढाई लढून मराठ्यांनी शेवटी यश आपल्या पदरात पाडून घेतलं. आतापर्यंत मिळालेल्या यशाचं सर्व क्रेडिट मी मराठा समाजाला देतो. त्यांनीच हे सगळे यश मिळवले आहे, मी नाममात्र आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठा आरक्षणात जाणार याच्यात तीळ मात्र शंका नाही आणि कोणी शंका देखील ठेवायची देखील नाही, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यासाठी गॅझेटियर करायचा आहे. त्याचा जीआर निघणं खूप अवघड होतं. जो 1881 पासून काढला नाही, एक साधी ओळ मराठ्यांच्या हिताची सरकारने लिहिली नव्हती, 75 ते 76 वर्ष झाले, मराठ्यांचं मराठवाड्यातील हक्काचा गॅझेटियर असून साधी ओळ देखील मराठ्यांच्या हिताची एक ओळ सरकारने दिली नव्हती, फक्त शांतता आणि संयम ठेवा आणि शांत डोक्याने विचार करा, एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवून कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही आणि विश्वास ढळू द्यायचा नाही, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.
मराठवाड्यातील मराठा आरक्षणात गेला, कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या. मी घालतो तुम्ही काळजी करायची नाही. फक्त एक काम करावं लागेल जे लोक सोशल मीडियावर बोलत होते, त्यांना आधी उत्तर देत नव्हतो. त्यांना आता उत्तर द्यावे लागतील. त्यांनी आयुष्यात काय केलं आहे, त्यांनी समाजासाठी काय केलं? आम्ही केलं, आम्ही समाजासाठी झगडलो, पण त्यांनी काय केलं? सोशल मीडियावरती गुळगुळ लिहिता, आज हजारो पोरं पोरी नोकरीला लागले आहेत, तुम्ही काय केलं, हैदराबाद गॅझेटियरसाठी जीआर काढला आहे, तो फक्त मसुदा किंवा ड्राफ्ट नाही, आल्या आणि घेऊन पळाले. ज्या मागण्या आहेत त्या मान्य करणार असल्याचं सांगितलं आहे. आर्थिक मदत आणि नोकरीचं सांगितलं, केसेस मागे घ्यायला सांगितले आहेत. पंधरा दिवस किंवा महिन्याच्या आत हे होईल, बलिदान गेलेल्या कुटुंबातील आर्थिक मदत आणि नोकरीचा विषय देखील लवकरच होणार आहे, सगळे काम मी करून घेत आहे. फक्त माझं समाजाला एकच म्हणणं आहे, शांत आणि संयमी राहा आणि विश्वास ठेवत राहा, असे पुढे जरांगे म्हणालेत.
निर्णय घेताना कायम आम्ही दोघेजण निर्णय घेतो. मी कधी निर्णय घेताना एकटा घेत नाही, सात करोड गोरगरीब जनता आणि मी मिळून निर्णय घेतो, सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरवायचं चाललं आहे, ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी तिघा जणांची समिती केली आहे, गाव स्तरावर आणि तालुका स्तरावर हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी तिघा जणांची समिती केली आहे. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची जमीन केली असेल तर हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार ही प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. हे लक्षात ठेवा. मी तुमचं का वाटोळ करेन, मराठा समाजाचं मी का वाटोळं करेल? दोन-चार जण बोलले असं पत्रकार बांधवांचे म्हणणं आहे, समाज आनंदी आहे. आम्हाला कोणाचं देणंघेणं नाही, या पलीकडे सांगतो जर गैरसमज वाटत असेल तिथे आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलं आहे, मराठा समाजाच्या लेकरा बाळाचं आणि समाजाच्या लेकरांचं कल्याण करतोय, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.