मराठा क्रांती मोर्चाने केले साखळी उपोषण तात्पुरते स्थगित

0
303

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – गेल्या १० दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करीत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे दि.२५ ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू केले होते.गुरुवार दि.२नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी,काही वकील,निवृत्त न्यायाधिश आणि काही मंत्री अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते.प्रदीर्घ चर्चेनंतर सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ मागितला, तो जरांगे पाटलांनी मान्य केला व आमरण उपोषण सोडले.

तसेच आंदोलन तात्पुरते स्थगित केले.सरकारला अजून काही वेळ दिला.यावेळी सरकारने एक महिन्याच्या आत मराठा आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्याचे वचन दिले. तसेच गावोगावी शासनाच्या वतीने सर्व्हे करून जुन्या नोंदी तपासून कुणबी असल्याचे ज्यांचे पुरावे सापडतील अशा सर्वांना व त्यांच्या नातेवाईकांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया विना विलंब राबविणार असे आश्वासन दिले.तसेच इतर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून मराठा समाजास कायमस्वरुपी टिकाऊ आरक्षण देणार असल्याचेही मान्य केले.

हा मराठा समाजाचा अल्पविजय आहे, जो पर्यंत सरकार सर्व आश्वासने पूर्ण करीत नाही तोपर्यंत मराठा समाज सावध राहील सरकारच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवेल,असे पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत ठरले. तसेच जातीनिहाय जनगणना करावी या मागणीकडे सरकारने दूर्लक्ष केले. याविषयी आजच्या बैठकीत तीव्र शब्दात नापसंती व्यक्त करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सर्व पक्षीय बैठकीतसुद्धा या विषयी चर्चा झाल्याचे कुठलेही वृत्त नाही. तसेच मराठा आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री दिल्लीला का गेले नाहीत.या विषयी नाराजी व्यक्त झाली.एवढे सर्व होऊनसुद्धा,या सरकारने दोन महिन्यात कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण दिले नाही,तर हे निष्क्रीय,फसवे सरकार आहे. त्यास जागा दाखवावी लागेल. फसव्या सरकारची फसवी घोषणा ‘‘शासन आपल्या दारी आहे…’’पण मराठा समाज इतर समाजाच्या मदतीने ‘‘हे सरकार बसवा घरी’’ ही घोषणा देऊन ती खरी करून दाखवेल व येणाऱ्या सर्व निवडणुकीत सरकारचे विसर्जन केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा या वेळी देण्यात आला.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या उपस्थितीत चहा घेऊन साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.याप्रसंगी,सतिश काळे,प्रकाश जाधव,मारुती भापकर,वैभव जाधव,सुनिता शिंदे,मीरा कदम,स्मीता म्हसकर,नकुल भोईर,पांडुरंग प्रचंडराव,मोहन जगताप, काशिनाथ जगताप,शरद थोरात, राजन नायर,रावसाहेब गंगाधरे, सयाजी भांदीगरे,सुनिल शिंदे, वसंत पाटील,शाम पाटील, पद्माकर कवे,ब्रम्हानंद जाधव, सर्जेराव पाटील इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.