मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करा; मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची मागणी

0
200

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील व लाखो कार्यकर्ते येत्या बुधवारी पिंपरी चिंचवड शहरातून मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे. याबाबत सचिन चिखले यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ बुधवारी मुंबईला धडक देणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून,लाखो आंदोलक महामोर्चात सामील झाले आहेत. अंतरवाली सराटी येथून पदयात्रेला शनिवारी सुरुवात प्रारंभ झाला आहे. ही पदयात्रा बुधवारी (ता.२४) पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी फाटा येथे येणार आहे. तेथून जगताप डेअरी, काळेवाळी फाटा, डांगे चौक मार्गे चाफेकर चौक, चिंचवड स्टेशन, आकुर्डी मार्गे भक्ती-शक्ती समूह शिल्प येथे पोहोचेल. या मोर्चामुळे गर्दीचा उच्चांक मोडण्याची दाट शक्यता आहे. ही पदयात्रा सुरळीत पार पाडावी. यासाठी पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयाने नियोजन करीत आहेत. या मोर्चामुळे शालेय वाहतुकीस अडचण निर्माण होऊ नये अथवा विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकू नयेत,या दृष्टिकोनातून बुधवारी सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे.