मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील आहेत?

0
139

अमरावती, दि. २ (पीसीबी) – मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागण्यासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. पण, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास राज्य सरकार अनुकूल दिसत नाही. यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारला खडसावलं आहे.

“मराठा ओबीसी नाही का? मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील आहेत? मराठ्यांचा आरक्षणावर अधिकार नाही का?” अशा प्रश्नांची सरबत्ती बच्चू कडूंनी सरकारला केली आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, “देशात ओबीसींचा वाटा जास्त आहे. पण, ओबीसींना मिळालेलं आरक्षण कमी आहे. २७ टक्क्यांच्यावर ओबीसींना आरक्षण नाही. ओबीसी आरक्षणात वाढ करून त्यात अ,ब,क,ड असे वर्ग करा. मराठा समाजाला ओबीसीमधून थेट आरक्षण नाही म्हणणं, हे चुकीचं आहे.”

“मराठा ओबीसी नाही का? मराठा कोण आहे? पाकिस्तान की अमेरिकेतील आहेत का? मराठ्यांना आरक्षणाचा अधिकार नाही का? मराठ्यांचं मागासलेपण सरकारला माहिती नाही. मग, मराठ्यांना आरक्षण का नाकारता?” असा प्रश्न बच्चू कडूंनी सरकारला विचारला आहे.

“महाराष्ट्रात वाढत चाललेला भेदभाव चुकीचा आहे. राज्यात सगळीकडे मराठा-कुणबी आहेत. फक्त मराठवाड्यात ‘मराठा’ लिहिल्यानं चालत नाही. संत तुकाराम महाराजांनी स्वत: सांगितलं की, ‘बरे झाले देवा कुणबी झालो’. ते मोरे ‘मराठा’ लिहितात. इतकं स्पष्ट असताना आरक्षण नाकारणं म्हणजे जाणीवपूर्वक पळवाट काढल्यासारखं आहे,” अशी टीकाही बच्चू कडूंनी सरकारवर केली आहे.