मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा एल्गार – सुभाष जावळे पाटील

0
228

६ मे रोजी पिंपरी चिंचवड येथील एल्गार परिषदेतून सरकारला देणार अंतिम इशारा

पिंपरी, दि. 26 (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षापासून आंदोलने केली. यात पन्नास पेक्षा जास्त युवकांनी बलिदान देऊन मिळवलेले मराठा आरक्षण हे राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पुन्हा अभ्यास न करता शासनाने दाखल केलेली पुनर्विचार याचिका देखील फेटाळली आहे. या प्रकारामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. आता मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांची पुणे, पिंपरी चिंचवड येथे येथे शनिवारी दिनांक ६ मे २०२३ रोजी मराठा आरक्षण एल्गार परिषद घेण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण समन्वय समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष दादा जावळे पाटील यांनी दिली.

पिंपरी येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी धनाजी येळकर पाटील संस्थापक अध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ, सुधाकरराव माने संस्थापक अध्यक्ष संभाजी सेना, रामेश्वर शिंदे प्रदेशाध्यक्ष संभाजी सेना, चंद्रकांत सावंत सचिव मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र ठाणे, देविदास राजळे पाटील उपाध्यक्ष मराठा आरक्षण समन्वय समिती मुंबई, रूपाली राक्षे पाटील महिला प्रदेशाध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ, अनिता पाटील अध्यक्ष स्वाभिमानी महासंघ, संतोष वाघे शहराध्यक्ष, दादासाहेब पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, विजय कोरडे पुणे जिल्हाध्यक्ष, गणेश सरकटे पाटील संपर्कप्रमुख पुणे जिल्हा, गणेश भांडवलकर शहर उपाध्यक्ष, सुरज ठाकर, आकाश हरकरे, हेमलता लांडे पाटील जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, ज्योती सगर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील श्रमशक्ती भवन, पुणे मुंबई महामार्ग, आकुर्डी येथे दुपारी १२ वाजता होणाऱ्या या एल्गार परिषदेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या एल्गार परिषदेमधून सरकारला खालील मागण्यासाठी अंतिम इशारा देण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा.आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नये. अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे. पंजाबराव देशमुख निर्वाण भत्ता व वस्तीगृहाचा लाभ सरसकट मराठा विद्यार्थ्यांना मिळावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मिळणाऱ्या कर्ज प्रकरणासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करावी. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.

या एल्गार परिषदेत सर्व मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे अशीही माहिती मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष दादा जावळे पाटील यांनी दिली.