मराठा आरक्षणावर मुंबईत २० जानेवारीला मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण

0
294

बीड, दि. २३ (पीसीबी) – बीडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची ‘निर्णायक इशारा सभा’ पार पडली. या सभेत जरांगे-पाटलांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईत २० जानेवारीला आमरण उपोषण करणार, असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. मराठ्यांवर दबाव टाकणं सोप्पं नाही, असा इशाराही जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे.

जरांगे-पाटील म्हणाले, “सरकारनं मराठ्यांना नोटीसा दिल्या आणि मुंबईत १८ जानेवारीपर्यंत १४४ कलम लागू केलं. त्यामुळे २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करण्यात येईल. २० जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील.”

मराठा आरक्षणालाठी लढणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी १८ जानेवारीपर्यंत नोटिस दिल्या आहेत. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता, पण मराठ्यांना दाबू शकणार नाही. आतापर्यंत खूप झालं. आता मुंबईत २० जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्यात येईल. त्यासाठी मराठ्यांनी शांततेत मुंबईत यायचं. मराठा आंदोलनात जाळपोळ करू नका, जो जाळपोळ करेल तो आपला नाही असं मनोज जरांगे म्हणाले.

त्या आमदारांना दारातसुद्धा उभा करू नका
जे आमदार आणि खासदार मराठा आंदोलनासाठी साथ देत नाही, त्यांना यापुढे दारातही उभे करू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. मनोज जरांगे म्हणाले की, “आतापर्यंत मराठ्यांच्या जीवावर हे आमदार, खासदार झाले, पण मराठा आरक्षणाच्या विषयावर कितीजण पुढे आले. आता यापुढे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे साथ देणार नाहीत त्या आमदारांना दारातही उभा करू नका. जो मराठा आरक्षणासाठी लढेल तो आपला.”