मुंबई, दि. १६ (पीसीबी) – विभागीय आयुक्तांच्या बैठकीनंतर बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. २२ जानेवारीला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. नवीन ड्राफ्ट मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे.
बच्चू कडू म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी ३० ते ३५ हजार नोंदी मराठवाड्यातील आहेत. सगेसोयरे यांना आरक्षण कस देता येईल यासंदर्भात एक मसूदा तयार करण्यात आला. या संदर्भात अधिसूचना काढणार आहोत. त्या देखील मनोज जरांगे यांनी दाखवण्यात येणार आहे.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ४ सचिव यांच्यासोबत ५ तास बैठक झाली. या बैठकीत एका-एका शब्दावर चर्चा करण्यात आली. एक मसुदा आता मनोज जरांगे यांनी दाखवणार आहोत. मसुदा जरांगेंना दाखवल्यानंतर त्यांची भूमिका लक्षात घेण्यात येईल. त्यांचे मत आम्ही जाणून घेऊ. प्रशासन जास्तीत जास्त दाखले देणार आहे. स्वयंपाक केला पण जेवण नाही, असं होऊ नये म्हणून सरकार याची काळजी घेणार आहे. मी देखील त्याचा आढावा घेणार आहे. आता विभागीय बैठक झाली, आता जिल्हास्तरावर जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले.
यावेळी बच्चू कडू यांनी एक उदाहरण सांगितलं. ते म्हणाले, एक नमुना आम्हाला भेटला यामध्ये राघोजीराव लिहलं आहे. या नमुन्यात गाव आलं पण आडनाव आलं नाही. आडनाव न आल्यामुळे शोधणं खूप कठीण जातं. तो एक प्रस्ताव आपण नव्याने तयार करत आहोत. आपण संपूर्ण वंशावळ काढणार आहोत. एक प्रस्ताव देऊन सरकारला देणार आहोत. यासाठी वेगळी टिम देखील तयार करण्यात येणार आहे. कोतवाल बूक आणि जन्म-मृत्यू नोंदी मराठवाड्यात सापडत नाहीत. काही गहाळ झाले किंवा ठेव ठेवली गेली नाही. विदर्भात ह्या नोंदी सहज सापडतात. जे कागदपत्र आहेत ते जिर्ण आहेत मात्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे हे मोठे यश आहे की आपण एक कोटी ९४ लाख लाख कागदपत्रांची आपण तपासणी केली.
एका-एका जिल्ह्यात ३०-३० लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. ३३,३४ चे नमुने पुरावा म्हणून पाहण्यासाठी आपण नियम तयार केला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दाखले देण्याचा आपण प्रयत्न करु. सगे सोयरे, जुणे पुरावे ३३, ३४ नमुना तसेच त्र्यंबकेश्वर, भटाकढे असलेली माहिती, लसीकरणाची माहिती पुरावा किंवा सहपुरावा म्हणून गृहीत धरण्याबाबत आपण ती अधिसूचना काढणार आहोत, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
प्रशासनात खूप मोठं काम झालं आहे. आडनाव, वंशज अशी खूप मोठी प्रोसेस आहे. मनोज जरांगे यांना आधी अधिसूचना देणार आहोत, त्यांना सर्व मुद्दे पटले तर अधिसूचना सार्वजनिक करु, अशी माहिती देखील बच्चू कडू यांनी दिली.