पिंपरी-चिंचवड मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
पिंपरी, दि. 25 (पीसीबी) : छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्व महापुरूषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमित देशाचे पंतप्रधान गेल्या वर्षभरात जवळपास दहा ते बारा वेळेस आले आहेत. राज्यात अनेक विषय ज्वलंत आहेत. त्यावर तोडगा निघाला नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षणासाठी अनेक योद्धे रस्त्यावरचे युद्ध लढत आहेत. मात्र त्याकडे मोदी सरकार कानाडोळा करत आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे निकृष्ठ काम केले जाते. तर मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपतींचे स्मारक उभारणीचे काम अद्यापही प्रलंबितच आहे.या प्रश्नांसह अनेक बाबींवर जाब विचारण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.पुणे येथे उद्या गुरूवारी (दि. २६) होणाऱ्या कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांच्यासह हजारो कार्यकर्ते पंतप्रधानांना जाब विचारणार आहेत.
निवडणूकीच्या तोंडावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सातत्याने दौरे आखत आहेत. गेल्या वर्षभरापासून दहा ते बारा वेळेस ते महाराष्ट्रात आले आहेत.धुळे,रायगड, शिर्डी,मुंबईसह पुणे आदी भागात ते सातत्याने येत आहेत.या कार्यक्रमात केवळ आश्वासनांचा डोंगर उभा करून सर्वसामान्य जनतेची घोर फसवणूक करण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे.प्रत्यक्षात अनेक योजना येत नसून त्या कागदावरच राहत आहेत.महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा लढा मोठ्या प्रमाणात चालू आहे.मनोज जरांगे पाटील यांचे सातत्याने उपोषणे चालू आहेत. लाखोंचे मोर्चे आयोजित करण्यात आले.तरी देखील मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाही आपली भूमिका उघड करत नाहीत. रायगड येथे निकृष्ठ कामामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची दुर्देवी घटना घडली. त्यावर केवळ मनधरणी करण्यासाठी माफी मागण्यात आली. प्रत्यक्षात त्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाईकडे दुर्लक्ष केले. मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन करून बरेच वर्ष लोटले आहेत.
परंतु अद्यापही त्या कामाला सुरुवात झाली नाही. ही महाराष्ट्रातील शिवप्रेमींची फसवणूक आहे. या प्रश्नांवर भ्र देखील न काढणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यात नियोजित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहून मराठा आंदोलक,मराठा आरक्षण,छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकासह अनेक रखडलेल्या प्रश्नांवर जाब विचारणार आहेत. हे प्रश्न कधी मार्गी लावणार याची हमी मागणार आहेत. असे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.