मराठवाडा, विदर्भातील १२ आमदार संपर्कात, काँग्रेसला मोठी गळती

0
263

– भविष्यात त्यांच्याकडे कार्यकर्तेच शिल्लक राहणार नाहीत – चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. २ (पीसीबी) : भाजपमध्ये लवकरच मोठे प्रवेश होणार आहेत, त्यामुळे भविष्यात काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्तेच शिल्लक राहणार नाहीत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. अकोला येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना फडणवीस हे दिल्लीला जाणार नसून ते महाराष्ट्रातच राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नसले तरी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. फडणवीस यांच्यावर बावनकुळे यांची उमेदवारी कापल्याचा आरोप गेल्या विधानसभा निवडणुकीत झाला होता. मात्र आता फडणवीस यांच्यामुळेच बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याचे बोलले जाते.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या काही दिवसात राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि उद्धव सेनेतून मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी आघाडीमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आघाडीतील तीनही पक्षांकडे कार्यकर्तेच राहणार नाही अशी परिस्थिती आहे.

येत्या काही दिवसांत अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप हा राज्यातील नंबर एकचाच पक्ष राहणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय समितीमध्ये निवड झाल्यानंतर ते दिल्लीला जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

समितीतून वगळण्यात आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर फडणवीस दिल्लीला गेल्यास बावनकुळे हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी भविष्यावाणी देखील नुकतीच केली. यावर देखील बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत फडणवीस कुठेही जाणार नाहीत, ते महाराष्ट्रातच राहतील असे सांगत आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगून टाकले.