मराठवाडा, विदर्भातील पूरग्रस्त बळीराजा रिलीफ फंड अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाचा उपक्रम

0
41

दि.२५(पीसीबी)-मराठवाडा, विदर्भासह राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतमाल, जनावरे, घरे, पिके या सर्वांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांवर उपजीविकेचे गंभीर संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या तर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी “शंभर रुपये आपल्या बळीराजासाठी” ही योजना राबविण्यात येत आहे.

संघटनेच्या वतीने २६ ते २८ दरम्यान तीन दिवसीय दिवाळी फेस्टिवल एक्स्पो कार्यक्रमातून या उपक्रमाचा आरंभ होणार आहे. “बळीराजा रिलीफ फंड योजना” सुरू करत आहोत. या योजनेत सर्व समाजबंधूंनी तसेच एक्स्पोला भेट देणाऱ्या मान्यवरांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

प्रत्येकाने किमान शंभर रुपये किंवा आपल्या सामर्थ्यानुसार अधिक रक्कम देऊन शेतकरी बांधवांच्या मदतीस हातभार लावावा.
जमा होणारा संपूर्ण निधी पारदर्शक पद्धतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविला जाईल. चला, आपण सर्व मिळून या समाजकार्याला बळकटी देऊया आणि आपल्या बळीराजाच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करूया, असे कळकळीचे आवाहन अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाने केले आहे.