मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला, कष्टकरी, निराधार मुलांना पोशाख व मिठाई वाटप करून दिवाळी साजरी

0
206

पिंपरी,दि.०७(पीसीबी) – मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अशा कामगारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची दिवाळी, नंतर पाहू आपली’ या भूमिकेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची निराधार मुले मुली, सफाई कर्मचारी, पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना पोशाख व मिठाई, घरकाम करणाऱ्या महिलांना साडी आणि मिठाई वाटप वाटप करण्यात आली. 

पिंपळे गुरव पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, महापालिकेचे सफाई कामगार, भोसरी धावडे वस्ती येथील घरकाम करणाऱ्या महिला, विकास अनाथ आश्रम मोरे वस्ती चिखली येथील अनाथ मुले, घंटागाडीवर काम करणाऱ्या पुरुष व महिला, मे बेसिक्स मुनिसिपल वेस्ट व्हेचर्स कंपनीचे कर्मचारी आदी सर्वांना साडी, कपडे व मिठाई वाटप करण्यात आली.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, विकास अनाथ आश्रम संस्थेचे अध्यक्ष माऊली हरकळ, कामगार नेते बाळासाहेब साळुंके, घंटागाडी मुकादम विनोद कांबळे, बळीराम माळी, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, समाजसेविका विजया नागटिळक, सूर्यकांत कुरुलकर, नितीन चिलवंत, किरण परमार, सागर मगर आदी उपस्थित होते.

याबाबत अरुण पवार यांनी सांगितले, की आपल्या माणसांसाठी वर्षातील सर्वात मोठा आनंद वाटता येणारा सण दिवाळी आहे. मराठवाडा जनविकास संघ विविध घटकांना सोबत घेऊन नेहमीच दिशादर्शक आणि सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवत आहे. प्रथम कष्टकऱ्यांची दिवाळी साजरी झाली पाहिजे, या भावनेतून या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.