मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी रास भरुन अर्पण केला आंब्यांचा महानैवेद्य

0
152

दि ११ मे (पीसीबी ) – साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने भंडारा डोंगरावरील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी रास भरुन आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
पूजा, आरती करून आपल्या आमराईतील आंबे गाभाऱ्यात आकर्षकपणे मांडण्यात आले. तसेच मंदिरात फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. अशा प्रसन्न वातावरणात अक्षयतृतीयेच्या निमित्ताने संत तुकोबाचरणी सेवा अर्पण करण्यात आली. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, धारूरचे सरपंच बालाजी पवार, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ. प. बाळासाहेब काशीद, ह. भ. प. जगन्नाथ नाटक पाटील, ह. भ. प. जोपाशेठ पवार, ह.भ.प. ढमाले मामा, संजीव पवार, ह.भ. प. अनिल कारके, ह. भ.प. राजेंद्र महाराज ढोरे, ह.भ.प. पंडित बसे, ह. भ. प. राजाराम बोत्रे, ह.भ. प. नारायण भेगडे, ह.भ.प. शिवाजी शेलार, विजया कारके, तसेच पवार परिवारातील सदस्य, भाविक उपस्थित होते.
दरम्यान, आंब्याची आरास पाहण्यासाठी तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. आंब्याचा हा प्रसाद भाविक भक्तांना देण्यात येणार आहे.
अरुण पवार यांनी सांगितले, की माझे बंधू सरपंच बालाजी पवार यांनी मेहनत घेऊन मराठवाड्यामध्ये पाण्याची समस्या असतानाही टँकर, तसेच शेततळ्याच्या माध्यमातून 5000 केसर आंब्याच्या झाडांचे संगोपन करून शेती फुलवलेली आहे. आमच्या आमराईतील आंबे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी अर्पण करून सेवा केली. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणची झाडे सुकून चालली आहेत. आम्हाला ज्या ठिकाणची झाडे पाण्याअभावी सुकत असल्याचे दिसताच पाणी देऊन झाडांना जीवनदान देत आहोत. यावर्षी लवकर पाऊस येऊन पाण्याचा प्रश्न सुटावा, आणि संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील शेतकरी माझा बळीराजा सुखी व्हावा अशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज चरणी प्रार्थना केली आहे