आळंदी, दि. १६ (पीसीबी) – तुम्ही बायबल वाचता का, चर्चमध्ये या आम्ही तुमच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत करू असे आश्वासन देत १४ जणांनी खेड तालुक्यातील मरकळ गावात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवारी (दि. १५) रात्री घडला.
प्रदिप मधूकर वाघमारे, प्रशांत मधुकर वाघमारे (वय ३०, दोघे रा. चऱ्होली), रोनक शैलेश शिंदे (वय १८), तेजस प्रकाश चांदणे (वय ३५), अशोक मुकेश पांढरे (वय १९), मुकेश जयकुमार विश्वकर्मा (वय २५), लक्ष्मण श्रीरंग नायडू (वय ३५), म्युंगी ब्युयुंग वुन (वय ३८), ज्युईल वोमन युन (वय ३६, सर्व रा. भोसरी), पाच महिला यांच्या विरोधात याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रसाद भाऊसाहेब साळुंखे (वय २५, रा. मरकळ, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मरकळ गावात लोकांच्या घरासमोर जाऊन तुम्ही बायबल वाचता का, चर्चमध्ये या आम्ही तुमच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत करू, असे आमिष दाखवले. यातून आरोपींनी दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी परिसरात अशाच प्रकारची आणखी एक घटना मागील काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. त्याबाबत देखील पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा तसाच प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.












































