ममदानी आहेत की ‘मान’ -सुकृत करंदीकर

0
4

दि.०८(पीसीबी)-न्यूयॉर्कची लोकसंख्या ८० लाख आहे आणि या शहरातले नोंदणीकृत मतदार ५३ लाख. यात मुस्लिम मतदान ३.५० लाख, ज्यापैकी १ लाख मुस्लिमांनी निवडणुकीत ममदानींचे स्वयंसवेक म्हणून नोंदणी केली होती. (जोहरान ममदानी हे न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर होणार असल्यानं हे उल्लेख आवश्यक आहेत) एकूण मतदारांपैकी निम्म्यांनीही मतदान केलं नाही. (आपल्याकडच्या काहींचं अगाध लॉजिक लावायचं तर यामुळे ममदानी हे न्यूयॉर्कचे महापौर म्हणवून घेण्यासच लायक नाहीत)

फक्त २० लाख ५५ हजार ९२१ न्यूयॉर्कवासीयांनी मतदानाचा हक्क बजावला.

जोहरान ममदानी यांना मते मिळाली १० लाख ३६ हजार ५१.

दुसऱ्या क्रमांकावरील पराभूत अपक्ष उमेदवार ॲन्‍ड्र्यू कुओमो यांना ८ लाख ५४ हजार ९९५ मतं मिळाली.

अमेरिकी माध्यमांच्या वार्तांकनानुसार –

‘बटेंगे तो कटेंगे’ असं ममदानी प्रचारात कुठंही म्हणाले नाहीत, तरी न्यूयॉर्कमधल्या मुस्लिमांनी त्यांना एक गठ्ठा मतदान केलं.

सर्वाधिक आशियाई लोकसंख्या असलेल्या भागातून ममदानींना मिळालेली मते ४७%. (कुओमो यांना ४३%)

सर्वाधिक कृष्णवर्णीय मतदार असलेल्या भागातून ममदानींना मिळालेली मते ६१%. (कुओमो यांना ३५%)

सर्वाधिक हिस्पॅनिक मतदार असलेल्या भागातून ममदानींना मिळालेली मते ५७%. (कुओमो यांना ३७%)

सर्वाधीक श्वेतवर्णीय मतदार असलेल्या भागातून ममदानींना मिळालेली मते ३८%. (कुओमो यांना ५२%)

तुलनेला काहीच अर्थ नाही. पण सहज पाहिलं तर, देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या आपल्या मुंबईचं वार्षिक बजेट सुमारे ७५ हजार कोटींपेक्षा कमी आहे. मुंबईपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या न्यूयॉर्कचं बजेट मात्र मुंबईच्या जवळपास दहा पट जास्त; सुमारे ११६ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ९ लाख ५२ हजार ८४० कोटी रुपये. अशा न्यूयॉर्कच्या महापौरपदाची शपथ ममदानी येत्या १ जानेवारी रोजी घेतील. तेव्हा ममदानी यांच्या पाठीशी उभे राहिलेले न्यूयॉर्कमधले मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि स्थलांतरित फार आशेने त्यांच्याकडे पाहतील. न्यूयॉर्कमधल्या कामगार-नोकरदारांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांनी प्रचंड अपेक्षेने ममदानी यांना मतदान केलं आहे. ममदानींनी निवडणूकीत दिलेली आश्वासने या पाठीराख्यांना खूपच पसंत पडली.

भारतातल्या कुठल्याही निवडणुकीची आठवण व्हावी, अशाच ‘रेवडी संस्कृती’ची आश्वासनं न्यूयॉर्कमध्येही दिली गेली. या आश्वासनांना भुलून ममदानींची पाठराखण करणाऱ्या न्यूयॉर्कवासीयांना आपल्याकडचे पुरोगामी ‘गाय पट्ट्यातील मतदार’ म्हणून हिणवू शकतात. ममदानींची प्रमुख आश्वासनं अशी आहेत –

१) न्यूयॉर्कमधील सध्याच्या घरभाड्याचे दर गोठवणे. (याचा लाभ न्यूयॉर्कमधील २० लाख भाडेकरु कुटुंबांना होणे अपेक्षित आहे. मात्र हा नियम अस्तित्त्वात कसा येणार, याबद्दल अस्पष्टता आहे.)

२) शहरातील बस भाडेमुक्त (मोफत) करणे. (यामुळे ६० ते ८० कोटी डॉलर्सचा बोजा बजेटवर येईल. यापूर्वी २०२३-२४ मध्ये न्यूयॉर्कमधल्या पाच मार्गांवर ही योजना राबवण्यात आली, ज्यामुळे बजेटवर ताण आला. आता संपूर्ण शहरातील बस फुकट दिल्यानंतर हा खड्डा ममदानी कसा भरुन काढणार याचं उत्तर तिथल्या तज्ञांना मिळालेलं नाही.)

३) येत्या २०३० पर्यंत किमान वेतन प्रति तास साडेसोळा डॉलरवरुन प्रति तास ३० डॉलर करणे. (या घोषणेमुळे रोजगारांचा काळाबाजार वाढण्याची आणि बेरोजगारीमध्ये भर पडण्याची भीती न्यूयॉर्कमधील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.)

४) घाऊक किमतीत किराणा माल विकणारी सरकारी स्वस्त रेशन दुकाने सुरु करणे. त्यांना १४ कोटी डॉलर्सचे वार्षिक अनुदान देणे. (ही दुकाने न्यूयॉर्क प्रशासन चालवणार असल्यानं त्यांना भाडे आणि मालमत्ता कर भरावा लागणार नाही. केंद्रीकृत गोदाम आणि पुरवठादारांकडून सोर्सिंग करुन ही योजना यशस्वी करण्याचा ममदानींचा प्रयत्न आहे.)

५) न्यूयॉर्कच्या लोकसंख्येत सुमारे १ टक्का असलेल्या ‘सुपररिच’ (गर्भश्रीमंत) मंडळींवरील उत्पन्न करात वाढ करणे आणि व्यवसायांवरील कॉर्पोरेट कर वाढवणे. यातून ९ अब्ज डॉलर्सचा महसूल नव्यानं उभारणे. (ममदानींना पाठिंबा देणाऱ्या प्रमुख राजकीय नेत्यांनी निवडणुकीपूर्वीच या आश्वासनाला स्पष्ट विरोध नोंदवला. कारण यामुळे धनदांडगे आणि व्यवसाय न्यूयॉर्कमधून बाहेर पडण्याचा धोका संभवतो; ज्याचा फटका अंतिमतः सामान्य न्यूयॉर्कवासीय करदात्यांच्या बोकांडी येण्याची भीती आहे. ममदानी यांच्या प्रचार मोहिम वेबसाईटवरील माहितीनुसार, त्यांचे प्रशासन कॉर्पोरेट टॅक्स ११.५ टक्के करु इच्छिते. तर गर्भश्रीमतांवर २ टक्के करवाढ लादू इच्छिते.)

६) “युनिव्हर्सल” डे केअर : बालसंगोपनाचा खर्च उचलणे ज्यांना परवडत नाही, अशा कुटुंबांचे स्थलांतर रोखण्यासाठी, ६ आठवडे ते ५ वर्षे या वयोगटातील मुलांना मोफत बालसंगोपन देण्याचे आश्वासन ममदानींनी दिले आहे. बालसंगोपन कामगारांचे पगार शिक्षकांच्या पगाराइतके करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे. यासाठी अंदाजे ६ अब्ज डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. (पार्टटाईम काम करणाऱ्या किंवा मुलांना सांभाळण्यासाठी घरी बसणाऱ्या पालकांना या घोषणेने आकर्षित केले.)

७) ममदानींच्या प्रचार मोहिमेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, “शहरातील कायमस्वरूपी परवडणाऱ्या, युनियन-निर्मित, भाडे-स्थिर घरांच्या उत्पादनात तिप्पट वाढ करण्याची त्यांची योजना आहे. याच साइटनुसार, सार्वजनिक निधी उभारून त्यातून येत्या १० वर्षांत २ लाख नवीन घरे बांधली जातील. (हा सार्वजनिक निधी कसा उभारणार याचा खुलासा ममदानींनी केलेला नाही)


यंदाच्या एप्रिलमध्ये प्रसिद्ध झालेल्या न्यूयॉर्क राज्य नियंत्रक अहवालानुसार, न्यूयॉर्कच्या २०२६ च्या ऑपरेटिंग बजेटचा ६.४ टक्के निधी म्हणजे ७.४ अब्ज डॉलर्सचा खर्च फेडरल निधीवर अवलंबून आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीतच धमकी देऊन ठेवली, की ममदानी महापौर झाल्यास न्यूयॉर्कला मिळणाऱ्या फेडरल निधीत कपात केली जाईल. आपल्याकडील अजित पवार वगैरे मंडळी “निवडून द्या, कामं करतो,” अशी वक्तवव्यं गावखेड्यात करत असतात. पण ट्रम्प प्रशासन केवळ धमकी देऊन थांबलं नाही. त्यांनी न्यूयॉर्कमधील १८ अब्ज डॉलर्सचा पायाभूत सुविधा खर्च निकाला आधीपासूनच गोठवला. याचा मोठा परिणाम न्यूयॉर्कवर झालेला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा ममदानींना असणारा तीव्र विरोध जगजाहीर आहे. ममदानी विरुद्ध ट्रम्प या संघर्षाला ”ट्रम्प विरुद्ध न्यूयॉर्क” असं राजकीय वळण देण्याची रणनिती ममदानी दाखवतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या महाराष्ट्रात नाशिककरांनी राज ठाकरे यांच्याकडं महापालिकेची सत्ता दिली. “एकहाती सत्ता द्या, नाशिकचा चेहरामोहरा बदलून दाखवतो,” असे निवडणूक प्रचारात राज म्हणाले. पाच वर्षांनी पुन्हा मतं मागायला गेले, तेव्हा राज्य सरकारवर खापर फोडण्याव्यतिरीक्त ते फार काही बोलू शकले नव्हते. किंवा राष्ट्रीय पातळीवर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतल्या कोणत्याही समस्येसाठी केंद्रातल्या मोदी सरकारला जबाबदार धरत. तसाच सामना ममदानी आणि ट्रम्प यांच्यात रंगणार अशी चिन्हे आहेत. आश्वस्त केलेल्या समाजवादी योजना ममदानी पार पाडतील की नाही, हे येणारा काळ सांगेल. “ही आश्वासने अट्टाहासाने रेटण्याचा प्रयत्न झाला तर न्यूयॉर्क पूर्वीपेक्षा स्वस्त न होता महागण्याचीच भीती जास्त आहे; शिवाय, न्यूयॉर्कच्या महसूलात मोठी घट होईल,” असं तज्ज्ञांना वाटतं आहे. या ‘रेवड्यां’साठी निधी उभारण्याचं आव्हान ममदानी यांना पेलावं लागेल.

त्यांची मूळं भारतीय, आफ्रिकी असणं, धर्म मुस्लिम असणं किंवा भाषणात त्यांनी पंडित नेहरुंचा दाखला देणं, यात आनंद मानण्याचा भाबडेपणा करण्याचं कारण नाही. ममदानींमध्ये ”उद्याचे बराक ओबामा” पाहण्याचा बालीश पोरकटणाही फार कोणी करणार नाही. ओबामांचा कार्यकाळ हा अन्य कोणत्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांप्रमाणेच अमेरिकी वर्चस्ववादाचं रक्षण करणारा आणि अमेरिकी हितसंबंधांच्या रक्षणासाठी कोणताही विधिनिषेध न बाळगता जगात कोणालाही चिरडणारा होता. फरक हा होता, की ट्रम्प यांच्याप्रमाणे ओबामा बोलभांड, उतावळे आणि कांगावाखोर नव्हते.

ममदानींनी न्यूयॉर्कमधली तरुणाई जिंकली. स्थलांतरित, अन्य उमेदवारांच्या तुलनेत सामान्य आर्थिक स्थितीतला, अराजकीय पार्श्वभूमीचा तरुण जगातल्या अत्यंत महत्त्वाच्या शहरांपैकी एक न्यूयॉर्कचा महापौर म्हणून निवडून येतो…तेही अवघ्या ३३ व्या वर्षी. ही बाब फार अनोखी आहे. अमेरिकेचं वैभव असणाऱ्या न्यूयॉर्कची सूत्रं हाती घेण्यासाठी ममदानी प्रचार करत होते, तेव्हा त्यांनी पॅलेस्टाईनला समर्थन देऊन ज्यूंची नाराजी ओढवून घेतली. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू न्यूयॉर्कमध्ये आले तर त्यांना अटक करण्यास मागेपुढं पाहणार नाही, असं धाडसी विधान केलं. “हिंदू वारशाचा मला अभिमान आहे,” असं सांगत न्यूयॉर्कमधल्या काही हिंदू मंदिरांमध्ये त्यांनी माथा टेकवला. मशिदींमध्ये ते गेले. चर्चच्याही घंटा वाजवल्या. एवढं करूनही ‘व्हाईट सुप्रिमसी’चा गंड बाळगणाऱ्या ख्रिश्चन धनदांडग्यांच्या विरोधात हसऱ्या-बोलक्या चेहऱ्याचे ममदानी निवडून आले.

शहराचं नेतृत्व निवडण्यासाठी न्यूयॉर्कवासीयांचे बदललेले निकष बदलत्या अमेरिकेचे चित्र दाखवतात. धर्म, वर्ण, आर्थिक स्थिती आणि स्थलांतरीतांचा टक्का यांचा न्यूयॉर्क निवडणुकीवरील प्रभाव निर्णायक ठरला. पंजाबवासीयांनी मुख्यमंत्री बनवलेल्या भगवंतसिंह मान आणि ममदानी यांच्यात गुणात्मक फरक तूर्त तरी काहीच नाही, हे न्यूयॉर्क निकालाचं प्रथमदर्शनी वैशिष्ट्य आहे. मान यांच्या नेतृत्त्वात पंजाब ज्या वेगानं आर्थिक दिवाळखोरीकडं निघाला आहे, तसं न्यूयॉर्कमध्ये लगेच घडण्याची शक्यता नाही. पण न्यूयॉर्कचे नवनिर्वाचीत महापौर जोहरान ममदानी जे स्वतःला लोकशाहीवादी समाजवादी म्हणवतात, त्यांनी भांडवलशाही साम्राज्याची राजधानी असणाऱ्या न्यूयॉर्कमध्ये ‘रेवडी तंत्र’ रुजवले; ज्याला न्यूयॉर्कवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला, हीच बाब सर्वात गमतीदार आहे. भारतीय वंशाचा असल्याचे पांग ममदानी यांनी फेडले आहेत ते असे. Is US becoming the land of survival & not of opportunities? Is ‘American Dream’ cracking with socialism dethroning the York of capitalism?

@सुकृत करंदीकर,
५ नोव्हेंबर २०२५.