दि .५ ( पीसीबी ) – मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.
दीर्घ आजारानंतर निधन
काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीही आल्या आणि त्यांचा मित्र राजू कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. चाहत्यांनी, कलाकारांनी मदत केल्यानंतर डॉ. उजवणे बरे झाले आणि त्यांनी सिनेसृष्टीत पुन्हा कमबॅक केलं.
‘कुलस्वामिनी’ या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. तसेच ‘२६ नोव्हेंबर’ या आगामी मराठी चित्रपटातही ते झळकणार होते. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
नागपूरहून मुंबईपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
विलास उजवणे यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी प्राप्त केली. मात्र अभिनयाची आवड त्यांना मुंबईकडे घेऊन आली. त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नाटके केली आणि मालिकांमधून घराघरात पोहोचले. ‘शुभम भवतु’ या डायलॉगमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली होती.
‘वादळवाट’, ‘दामिनी’, ‘चाल दिवस सासूचे’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केलं. एकूण ११० सिनेमे आणि १४० हून अधिक मालिकांमध्ये त्यांनी आपली अभिनयकला सादर केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.