मनोज जरांगे यांना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांचा कडक सलाम

0
161

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (पीसीबी) : मराठा आरक्षणासाठी साडेपाच महिन्यांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर आज यश आले. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या वेशीवर जाऊन धडकलेल्या मराठ्यांच्या वादळाचा धसका राज्य सरकारने अखेर घेतला. मनोज जरांगे-पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अध्यादेशाची प्रत वाशीत धडकलेल्या लाखो मराठाबांधवांच्या साक्षीने जरांगे-पाटील यांच्या हाती दिली.

मराठ्यांच्या एकजूटीचा आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यासारख्या सामान्य राजकारणविरहित व्यक्तीने प्रामाणिकपणे दिलेल्या लढ्याचे हे यश असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत. ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनीही या यशाबद्दल समस्त मराठा समाजाचे अभिनंदन करीत मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाला आपला सलाम असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. समाजमाध्यमावर इम्तियाज यांनी यासंदर्भात पोस्ट टाकत राजकारण्यांवरही निशाणा साधला आहे.