मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची जोरदार तयारी

0
5

दि. २५ (पीसीबी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करण्याची घोषणा करणारे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. “अंतरवालीतून २७ ऑगस्ट रोजी निघाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, खेड, चाकण, पुणे मार्गे पुढे लोणावळा, वाशी आणि चेंबूरमार्गे मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहोत.

अंतरवाली सराटी इथून निघाल्यानंतर पहिला मुक्काम किल्ले शिवनेरीवर होईल. तेथील माती कपाळी लावून दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी आपण शिवनेरीहून मुंबईला निघणार आणि २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आपण मुंबईतील आझाद मैदान इथं पोहोचणार आहोत,” असं जरांगे यांनी सांगितलं आहे.

उपोषणाबाबत अधिक माहिती देताना मनोज जरांगे म्हणाले की, “२९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपले आमरण उपोषण सुरू होईल. आधी आपण कल्याणवरून जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या मार्गात असणाऱ्या घाटाची आपल्या शिष्टमंडळाने पाहणी केली. घाटात मोठ्या प्रमाणात धुके असून १० फूट अंतरावरीलही काही दिसत नाही. त्यामुळे आपण वाशीमार्गे मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.