मनोज जरांगे यांचीतब्येत खालावली

0
159

जालना, दि. १४ (पीसीबी) गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये सामावून घेण्यासाठी सरकारकडे गेल्या काही महिन्यांपासून मागणी केली जात आहे. कोट्यवधींच्या संख्येने त्यांनी मुंबईकडे कूच केली होती. मात्र नवी मुंबईतील वाशीमध्ये मोर्च्याला अडवण्यात आलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश सादर केला. मराठा समाजाने जल्लोष केला. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण केलं असून त्यांची तब्येत खालावली आहे.

मराठा समाजाल आरक्षण देऊन अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीला पुन्हा एकदा आरक्षणाची मागणी केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र त्यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे अन्न, पाणी, औषध न घेतल्याने त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील हे उपचार घेण्यास नकार देत आहेत.

सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. कोणताही उपचार घेण्यासाठी ते नकार देताना दिसत आहेत. जिल्हा आरोग्य पथक अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची तपासणी करण्यासाठी दाखल झालं असून बीपी आणि नाडी तपासणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. डॉक्टर त्यांच्या चौकशीची विचारपूस करताना दिसत आहेत. त्यांनी पाणी तरी प्यायला हवं , मात्र ते जलप्राशन करण्यास नकार देत आहे, असं वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. याचे पडसाद हे राज्यभर पाहायला मिळाले आहेत. जालना येथे रात्री जालना- जळगाव रोडवर टायर जाळण्यात आली. लातूर, उस्मानाबाद अशा अनेक शहरांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एक रॅली काढण्यात आली. तर मालेगावमध्येही बंद पुकारला असून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

“अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नाही” –

मनोज जरांगे पाटील यांनी अध्यादेशीची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. असं ते खोल गेलेल्या आवाजामध्ये बोलत होते. घराघरामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही. मराठ्यांची लाट कशी उसळली आहे ती बघा. सरकारचे डोळे काय गेले आहेत का? अक्कल नाही का?, अशा शब्दात सरकारवर मनोज जरांगे पाटील यांनी टीकेची तोफ डागली आहे.

बीड बंदचे मेसेज सोशल मीडियाद्वारे व्हायरल –

सोशल मीडियावर बीड बंदचे मेसेज व्हायरल होताना दिसत आहेत. सरकारने दखल न घेतल्याने बंदची हाक या मेसेजमधून देण्यात आली आहे. सरकार गंभीर नसल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दरम्यान 20 फेब्रुवारीला सरकार अधिवेशन बोलावणार असून त्यात मराठा आरक्षणासंदर्भात स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.