मुंबई, दि. २५ (पीसीबी) – मला सलाईनमधून वीष पाजून मारण्याचा कट रचला. त्यामुळेच मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मला मारायचंच असेल, तर येतो मी सागर बंगल्यावर, मला मारून दाखवा, असा गंभीर आरोप केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गंभीर आरोप केले आहे. छत्रपतींशी शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा कुणाची तरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे असा आरोप त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मराठा कार्यकर्ते जरांगे पाटलांच समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची जरांगेंची भूमिका असून ते उपोषण स्थळ सोडून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आंतरवाली सराटीतील आंदोलन स्थळावरून निघून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नालेवाडी गावापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, मुंबईच्या दिशेने निघाले असताना अशक्तपणामुळे जरांगे पाटील यांना भोवळ आली, त्यामुळे येथे प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे.












































