मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यास करावा ते अजून लहान आहेत

0
239

पुणे, दि. ३० (पीसीबी) – कुठल्याही राजकीय नेत्याने मराठा आणि ओबीसी अशी झुंज लावून देऊ नये. आमच्या समितीने जेव्हा आरक्षण दिलं होतं तेव्हा कुणाचं आरक्षण काढून द्या असं नाही. मात्र कुणाचंही आरक्षण काढून मराठ्यांना द्यावं या मताचा मी नाही. मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यास करावा ते अजून लहान आहेत. आरक्षण कसं मिळतं? भारतीय घटनेत काय तरतुदी आहेत त्यांच्याविषयी वाचावं. मराठ्यांना विचारावं ते ओबीसी आरक्षण घ्यायला तयार आहेत का? मराठा समाज ओबीसींचं आरक्षण कधीही घेणार नाही असं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी म्हटलं आहे. आज पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

मराठा आरक्षणावरुन सध्या मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांच्या महाराष्ट्रातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या सभाही आता लवकरच सुरु होतील. याबाबत प्रश्न विचारला असता नारायण राणेंनी मनोज जरांगे पाटील लहान आहेत अजून असं म्हटलं आहे.

मराठा आरक्षणावर मी काही भविष्यवाणी वर्तवू शकत नाही. कारण मराठ्यांना आरक्षण यावर प्रत्येक नेत्याची मागणी वेगळी आहे. मी मगाशीही स्पष्ट केलं आता पु्न्हा सांगतो, कुणाचंही आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण न देता ५२ टक्क्यांच्या वर भारतीय घटनेच्या १५/४ प्रमाणे आरक्षण द्यावं. मागास आयोगाकडे पाठवावं, त्याचा सर्व्हे केला जावा. त्यानंतर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं हे माझं मत आहे.

प्रकाश आंबेडकर जर दंगलीची माहिती लपवत असतील तर त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन त्यांना अटक केली पाहिजे. कारण कुठल्या कालावधीत कुठल्या ठिकाणी दंगल होणार हे माहीत असेल तर त्याचा पुरावा द्यावा लागतो. ते म्हणाले असं चालत नसतं. प्रकाश आंबेडकरच नाही तर इतर कुणीही असं वक्तव्य केलं तर त्याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयीच मी बोलतो आहे असं नाही. ज्यांना दंगल होणार याची माहिती आहे आणि ते तसं वक्तव्य करत आहेत त्यांच्याविषयी बोलतो आहे असंही नारायण राणे म्हणाले.