मनोज जरांगे पाटील यांना बोलायला लावणारे तुमच्या आजूबाजूला, राऊतांचा फडणवीसांना टोला

0
179

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? हे जर देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना बोलायला लावणारे तुमच्या आजूबाजूला बसले आहेत का? ज्यांना महाराष्ट्र अस्थिर करुन काही वेगळं राजकारण करायचं आहे. जरांगे पाटील यांच्याविषयी माहिती असेलच. त्यांचे फोन वगैरे टॅप करण्यासाठी रश्मी शुक्लांना बसवलं आहे. त्या अनुभवी आहेत या सगळ्याच्या बाबतीत. कोण कुणाशी बोलतंय, पाठिंबा देतंय हे रश्मी शुक्लांना माहीत असतं. त्यामुळे अनुभवी डी.जी. असलेल्या रश्मी शुक्लांशी चर्चा केली पाहिजे. फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का? हे फडणवीसांनी जाणून घेतलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
तुमच्या सरकारमधले लोक काड्या लावत आहेत का? कोण जरांगेंशी बोलतं आहे हे जर देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल तर ते दुर्दैव आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

मला गोळ्या घातल्या जातील, एन्काऊंट केला जाईल ही मनोज जरांगेंची भाषा त्यांनी बहुदा भाजपाकडून घेतली आहे. जरांगे हे साधे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भाषेकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या भावना लक्षात घ्या. तुमच्याकडे जे भाजपाचे सुशिक्षित नेते, कडक इस्त्रीचे कपडे घालणारे ते काय भाषा वापरतात ते जरा बघा. एकमेकांना संपवण्याची भाषा त्यांची आहे. या राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार कुणी बिघडवला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाच्या नेत्यांनी बिघडवला आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राची सूत्रं गेल्यापासून महाराष्ट्रातली भाषा रसातळाला गेली आहे.
शेतकरी आंदोलन करताना मोदी डायव्हिंग करत आहेत. विकासासाठी मोदींसह गेलो असं अजित पवारांनी पत्र लिहिलं आहे. आता बहुदा अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनाही समुद्रात डुबकी मारुन स्कूबा डायव्हिंग करावं लागेल. मोदी करतील ते त्यांना करावंच लागेल. अजित पवार बहुदा धरणात उडी मारतील. असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.