मनेका गांधींना वाचाळपणाै नडणार, इस्कॉनची १०० कोटींची नोटीस

0
310

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – इस्कॉन मंदिराबाबत टीका केल्याने भाजप खासदार मनेका गांधी अडचणीत आल्या आहेत. या प्रकरणी इस्कॉन मंदिर आता गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. इस्कॉनकडून त्यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात येणार आहे. कोलकात्यातील इस्कॉनचे उपाध्यक्ष राधाराम दास म्हणाले, “मनेका गांधी यांच्या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले आहे.”

इस्कॉनचे उपाध्यक्ष राधाराम दास म्हणाले, “मनेका गांधी यांची टिप्पणी अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या चुकीच्या कमेंटमुळे जगभरातील इस्कॉनचे भक्त दुखावले गेले आहेत. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत असून, 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करणार आहोत. आम्ही आज त्यांना नोटीस पाठवली आहे. एवढ्या मोठ्या समूहाविरुद्ध कोणताही पुरावा नसताना खासदार किंवा माजी मंत्री असे खोटे कसे काय बोलू शकतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राधाराम दास म्हणाले, “मनेका गांधी दावा करत आहेत की, त्या आमच्या अनंतपूर गो-शाळेत गेल्या होत्या, पण तिथल्या कुणालाच याबाबत माहिती नाही. त्या कधी इथे आल्याचं आठवत नाही. इस्कॉन आपल्या गोशाळेतील गायी कत्तलखान्यात नेऊन विकत आहेत, असं त्यांनी घरी बसून निराधार वक्तव्य करणं अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू.”