मनुस्मृती ग्रंथ दहन आंदोलनादरम्यान आंबेडकरांचा फोटो फाडल्याचा आरोप

0
113

दि २९ मे (पीसीबी ) – ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रस्तावाविरोधात त्यांनी आज (२८ मे) महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचा आरोप आता अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत जितेंद्र आव्हाड यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे.

अजित पवार गटाचा आव्हाडांवर आरोप
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केले आहेत. “स्टंबाजीच्या नादात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये? आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध करतो”, असे अमोल मिटकरी म्हणाले. तसेच आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपाही आव्हाडांविरोधात आक्रमक
या मुद्यावरून भाजपाने जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिक घेतली आहे. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत अपमान केला. त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडायला भाग पाडले, दोनवेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत केले, त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही. काँग्रेसच्या संगतीने वावरणाऱ्या आव्हाडांनीही आज बाबासाहेबांचा अपमान केला”, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. तसेच “जितेंद्र आव्हाड आता हे सर्व अनावधानानं झालं असं स्पष्टीकरण देतात, पण बाबासाहेबांच्या बाबतीत अशी चूक होऊच शकत नाही. पोटातले बाहेर आले. धिक्कार, जितेंद्र आव्हाडचा धिक्कार. तुम्ही किती ढोंगी आहात हे आज समाजाने पुन्हा एकदा पाहिले”, असेही भाजपाने म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केली भूमिका :
दरम्यान, यासंदर्भात आता जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. “मी भावनेच्या भरात मनुस्मृती लिहिलेला फोटो फाडला. त्यावर बाळासाहेबांचादेखील फोटो होता. माझ्याकडून अनावधानाने हे घडलं. आम्ही काही मुद्दाम केलेलं नाही. मनूस्मृती फाडल्याचं दाखवावं म्हणून आम्ही ते पोस्टर फाडलं. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून तो फाडला असं कोणी म्हणत असेल तर तो मुर्ख आहे”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.