पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आज दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे सामुदायिक दहन, नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आले. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह या देशामध्ये विषमता प्रस्थापित करणाऱ्या, महिलांना शुद्राती शुद्रांपेक्षा अधिक हीन समजणाऱ्या, सामाजिक व्यवस्थेला धक्का देऊन महिलांच्या आणि शुद्रातीशुद्र समाजाच्या मुक्तीचा मार्ग खुला केला. आणि आजचे राज्यकर्ते मनुस्मृतीचा अंमल पुन्हा सुरू व्हावा यासाठी काम करत असताना, भारतीय संविधानाला अपेक्षित अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी मनुस्मृतीचे दहन आजही प्रसंगीक ठरते.
त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरामध्ये निर्माण करण्यात आलेल्या भीमसृष्टीमध्ये मनुस्मृती दहनाचे म्यूरल स्थापित करण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या सात वर्षांपासून नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने प्रत्येक 25 डिसेंबर रोजी मनुस्मृतीचे प्रतीकात्मक दहन करण्यात येते.
याप्रसंगी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, प्रदीप पवार, राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, डॉक्टर मनीषाताई गरुड, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, वैभव जाधव, छावा युवा मराठा महासंघाचे संस्थापक धनाजी येळकर पाटील, संजय जाधव, ओबीसी संघर्ष समितीचे सुरेश गायकवाड, रामचंद्र फुले, बाराखडीदार महासंघाचे नेते प्रताप गुरव, बुद्ध लेणी संवर्धन समितीचे मनोज गजभार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.













































