मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयचा छापा

0
380

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा मारला आहे. मनिष सिसोदियांनी याबाबत ट्विटवरुन माहिती दिली आहे. दिल्लीतील शाळांमध्ये हजारो कोटी रुयांचा घोटाळा केल्याचा आरोप सिसोदियांवर आहे. याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले असून अजून काहीही निष्पन्न झालेलं नाही. मी तपासात पूर्ण सहकार्य करणार, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. तसेच माझ्यावरील आरोप खोटे असून, न्यायालयात सत्य समोर येईल. मी दिल्लीतील शाळा आणि आरोग्य व्यवस्थेचे चांगलं काम करत असल्याने मला त्रास दिला जात आहे, असा आरोपही सिसोदियांनी केला आहे.

सिसोदिया यांनी ट्विट केले आहे की, आपल्या घरी सीबीआय आल्याची माहिती दिली. त्यांचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे आपला देश अजून नंबर-1 बनला नाही. दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण आरोग्याचे चांगले काम बंद पडावे म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल.

आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करु जेणे करून सत्य लवकर बाहेर येईल. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे.