सेक्टर 22 मध्ये वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरिकांचे हाल
पिंपरी दि. २५ (पीसीबी) -पिंपरी (प्रतिनिधी) – निगडी सेक्टर 22 मध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. गेली चार ते पाच महिने वीज खंडीत होत आहे. ही बाब महावितरण अधिका-यांच्या लक्षात आणून दिली. तरीही, याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. अधिका-यांच्या गलथान कारभारामुळे विजेचा खोळंबा होत आहे. याच्या निषेधार्त मनसेने आज निगडी प्राधिकरण उपविभागीय विद्युत कार्यालयावर आंदोलन केले. लावकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा मनसे स्टाईने तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महावितरणच्या अधिका-यांना दिला आहे.
प्रभाग क्रमांक 13 सेक्टर 22 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत गेली कित्येक दिवस विद्युत पुरवठा खंडीत आहे. फातिमा मज्जित समोरील ई-बिल्डिंग येथे गेली चार ते पाच महिन्यापासून डिओ जाणे, केबल त्रुटी निघणे, जम जाणे या समस्या होत आहेत. याकडे विद्युत विभागाच्या कर्मचा-यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे प्रभागात अंधार पसरत आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. ज्यांचे ऑनलाईन काम आहे, त्यांच्या कामाचा खोळंबा होत आहे. याला विद्युत प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप चिखले यांनी केला आहे.
या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. अधिका-यांना पत्रव्यवहार केला. तरीही समस्या जैसे थेच आहे. समस्या सुटत नसल्यामुळे आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. विद्युत प्रशासनाच्या गलथान कारभाराची सजा सर्वसामान्यांना मिळत आहे. लवकरात लवकर वीजेची समस्या सोडवावी. ई-बिल्डींगला नवीन केबल लवकरात लवकर टाकण्यात यावी. विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा मनसे यापेक्षा अधिक तिव्र आंदोलन करेल, असा इशारा चिखले यांनी दिला आहे.