मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर

0
330

पुणे, दि. ८ (पीसीबी)- मिनी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून सुरू आहे. त्यातच निवडणूक आयोगाने कामाचा आढावा घेतला आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांतच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम येथील निवडणुकीची घोषणा करण्यात येणार असून, या पाच राज्यांत दिवाळीनंतर फटाके फुटणार आहेत. नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला मतदान होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. २० नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान या पाच राज्यांतील निवडणुका होऊ शकतात. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम येथे एकाच टप्प्यात, तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत मतदान होऊ शकते.
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक सेमिफायनल मानली जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्य निवडणूक आयुक्त व राज्यातील निवडणूक अधिकारी व परीक्षकांची नुकतीच बैठक घेतली. दिवाळीनंतर २० नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे. मतमोजणी ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. त्याच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे येथे चार दिवसांत निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची शक्यता आहे.
निरीक्षकांसोबतच्या बैठकीनंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणामध्ये 2018 प्रमाणे एकाच टप्प्यात मतदान होऊ शकते. आगामी विधानसभा निवडणुका हिंसाचारमुक्त आणि कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या बळापासून मुक्त व्हाव्यात, याची खात्री करण्याचे निर्देश या बैठकीत दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या पोलिस, सामान्य आणि खर्च निरीक्षकांच्या बैठकीचा मुख्य उद्देश हा आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आणि मनी तसेच मसल पॉवरवर नियंत्रण ठेवणे हा आहे.