मध्य प्रदेशात काँग्रेसला १३० जागा मिळतील

0
184

भोपाळ, दि. ३० (पीसीबी) – मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून इथे काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट संघर्ष होत आहे. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसला १३० जागा मिळतील आणि सत्ता येईल असे भाकित वर्तविले आहे.

लोकसत्ताचे महेश सरलष्कर यांना दिलेल्या मुलाखतीत दिग्विजय सिंह म्हणतात, यावेळी १३० जागा मिळतील. गेल्या वेळी मी १२६ जागा जिंकू असे सांगितले होते पण, ११४ मिळाल्या होत्या.

प्रश्न: गेल्या विधानसभा निवडणुकीत चंबळ-ग्वाल्हेर भागांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे महत्त्वाचा होते. त्यांनी आमदार निवडून आणले होते. यावेळी ज्योतिरादित्य नसल्याचा काँग्रेसला फटका बसेल का?

दिग्विजय सिंह- ज्योतिरादित्य शिंदेंनी आमदार निवडून आणलेले नव्हते. हे आमदार काँग्रेस पक्षाच्या ताकदीवर निवडून आले होते. काही आमदार काँग्रेसला सोडून गेले. त्यातील काही पोटनिवडणुकीत पराभूत झाले. ग्वाल्हेर महापालिकेमध्ये तब्बल ५२ वर्षांनंतर काँग्रेसला सत्ता मिळाली. पारंपरिक भाजपकडे असणारी मुरैना महापालिका निवडणूकही काँग्रेसने जिंकली. आजघडीला मध्य प्रदेशात काँग्रेस मजबूत असून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या काँग्रेस सोडून जाण्यामुळे काहीही फरक पडलेला नाही.

प्रश्न: २०१८ मध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आले खरे, पण फूट पडली. आता काँग्रेसचे सरकार आले तर पाच वर्षे टिकू शकेल का?

दिग्विजय सिंह- काँग्रेसचे सरकार निश्चितपणे पाच वर्षे टिकू शकेल. काँग्रेसशी एकनिष्ठ राहणाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रश्न: काँग्रेसचे सरकार आले तर कमलनाथ मुख्यमंत्री बनू शकतील, पण नव्या पिढीतील कोण मुख्यमंत्री होऊ शकतो?

दिग्विजय सिंह- हाही आत्ता मुद्दा नाही. काँग्रेसची सत्ता आली तर जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे हेच आमचे लक्ष्य असेल.

प्रश्न: यावेळी निवडणुकीमध्ये तुम्ही फारसे न दिसण्यामागील कारण काय?

दिग्विजय सिंह- मी जेवढा राज्यभर दौरे करतो, तेवढा इतर कोणीही नेता करत नाही. मी मध्य प्रदेशातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आहे.

प्रश्न: काँग्रेसचा प्रचार मुख्यत्वे विद्यमान मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्याविरोधात केंद्रित असून त्याचा खरोखरच लाभ मिळेल का?

दिग्विजय सिंह- इथे शिवराजसिंह सरकारने अनेक घोटाळे केले आहेत, त्यांच्याविरोधात काँग्रेस आरोपपत्र घेऊन लोकांसमोर जात आहे. घराघरात भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची माहिती पोहोचवली जात आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या तीन मुद्दय़ांभोवती काँग्रेसने प्रचार केंद्रित केला आहे.

प्रश्न: प्रचाराचे इतर मुद्दे कोणते?

दिग्विजय सिंह- राजस्थानमध्ये २५ लाखांपर्यंतची आरोग्य योजना अशोक गेहलोत सरकारने लागू केली आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास त्याच धर्तीवर मध्य प्रदेशमध्येही सक्षम आरोग्य योजना तातडीने लागू केली जाईल. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन निधी दिला जाईल. शेतकऱ्यांसाठीही दिलासा दिला असून प्रति क्विंटल २६०० रुपयांनी गहू खरेदी केला जाईल. थकित वीजबिल माफ केली जाईल. शेतकऱ्यांना ५०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. घरगुती वापरासाठी विजेच्या दरामध्येही कपात केली जाईल. वारसाहक्काने मिळालेल्या घरांचे नोंदणीकृत करारनामे अनेकांकडे नाहीत, त्यांना सरकारकडून नोंदणीकृत कागदपत्रे दिली जातील. त्या आधारावर लोकांना र्कोही घेता येतील.

प्रश्न: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सौम्य हिंदूत्वाचा आधार का घेत आहे?

दिग्विजय सिंह- सौम्य हिंदूत्व अस्तित्वातच नाही. हिंदूत्वाचे धर्माशी काहीही देणेघेणे नाही. सावरकरांनी हिंदूत्वाचा शब्दप्रयोग केला होता. त्यांनी स्वत:च सांगितले होते की, हिंदूत्वाचा धर्माशी काही संबंध नाही. हिंदूत्व ही केवळ ओळख आहे. अनेकदा हिंदूत्वाचा चुकीचा अर्थ घेतला जातो